पिडीतेला न्याय मिळण्यासाठी सर्व चौकश्यांना सामोरे जाण्याची तयारी -सुशांत म्हस्के

पीडित महिला व आरपीआयला बदनाम करण्याचे षडयंत्र

मागासवर्गीय महिलेचे लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी गोविंद अण्णा मोकाटे यांच्या पत्नीने पोलिस प्रशासनाला दिशाभूल करणारे निवेदन दिल्याचा आरोप करुन, या प्रकरणात कोणालाही पैसे मागण्यात आलेले नसल्याचे आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे. तर आरोपीच्या पत्नीने मागणी केल्यानुसार कॉल रेकॉर्डिंग तपासणीसह सर्व चौकश्यांना सामोरे जाण्याची तयारी असून, मात्र पिडीत महिलेला न्याय मिळावा व आरोपीला त्वरीत अटक करण्याच्या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, संतोष पाडळे, ऋषी विधाते, शिवम साठे, विजय शिरसाठ आदी उपस्थित होते.
मागासवर्गीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी राजकीय कार्यकर्ता असलेल्या गोविंद अण्णा मोकाटे याच्यावर 4 डिसेंबर रोजी तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. 3 डिसेंबर रोजी पासून हा गुन्हा दाखल होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. या प्रकरणाची पोलिस निरीक्षकांनी कसून चौकशी करून सदर गुन्हा दाखल केला आहे. मनोज मोतियानी हे पत्रकार असल्याने त्यांच्याशी आमचा संबंध असून, मात्र या प्रकरणावर कधीही आमचे बोलणे झालेले नाही. तर हे प्रकरण दडपण्यासाठी कोणत्याही प्रकारे पैश्याची मागणी मोकाटे यांच्याकडे केलेली नाही. आरोपीच्या पत्नीने त्यांच्याकडे असलेले पुरावे न्यायालयात सादर करावे. पुराव्यात सतत्या असेल तर ते सुखरुप बाहेर येतील. मात्र एका सर्वसाधारण महिलेची लैंगिक शोषण करुन तिची बदनामी केली जात असेल तर हे कृत्य निंदनीय आहे. पोलिस प्रशासनाच्या जागरूकतेने मागासवर्गीय महिलेला न्याय मिळत आहे. त्यामध्ये आरोपींचा भाऊ व त्यांची पत्नी दिशाभूल करून खोटे आरोप करत आहे. पीडित महिला मागासवर्गीय असल्याने  या अत्याचाराला वेगळे वळण देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.
हे प्रकरण दाबण्यासाठी आरोपीला कोण पुढारी मदत करत आहे हे शोधणे देखील गरजेचे आहे. हा गुन्हा उलटून देखील बरेच दिवस झाले असून, आरोपी अद्यापि फरार आहे. या प्रकरणी कोणतीही चौकशी झालेली नाही. आरोपीची पत्नी पतीला वाचविण्यासाठी सदर प्रकरणाला दिशाभूल करून पीडित महिला व आम्हाला बदनाम करण्याचे कारस्थान करत आहे. पीडित महिला आरोपीच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असता, त्यांच्या पत्नीने तिची मनधरणी करून तिला तिथून पिटाळून लावले. जर या प्रकरणात पिडीत महिला व आंम्ही पैशाची मागणी केली असती, तर मोकाटे कुटुंबीयांनी त्यावेळेस खंडणीचा गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. या प्रकरणात कोणालाही पैश्याची मागणी करण्यात आलेली नाही. पिडीत महिलेला न्याय मिळण्यासाठी सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना गुन्हा दाखल करत असल्याची कल्पना देखील नव्हती. त्यांना जर माहित झाले असते तर राजकीय शक्तीचा वापर करुन पिडीत महिलेला न्यायापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पिडीत महिलेला न्याय मिळण्यासाठी चौकश्यांना सामोरे जाण्याची तयारी असून, आरोपी पत्नी व त्याचा भाऊ मुद्दामून दिशाभूल करून पीडित महिलेला बदनाम करत आहे. हा प्रकार त्वरित थांबवून आरोपीला अटक व्हावी, अन्यथा पीडित महिलेसह पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे.