पोलीस उपनिरीक्षकासह पाच पोलीस कर्मचारी निलंबित

राहुरी येथील कारागृहातील चार नंबर कोठडीतून शनिवार दिनांक १८ डिसेंबर रोजी पहाटे पाच आरोपींनी खिडकीचे गज कापून पलायन केले होते. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केलेले पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचारी असे एकूण सहा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
       राहुरी पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस हवालदार संजय राठोड, पोलीस नाईक संजयकुमार जाधव, रोहिदास गुंडाके, पोलीस शिपाई बाळू चाबुकस्वार व महिला पोलीस शिपाई मनिषा गुंड अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. दिनांक १८ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजे दरम्यान मोक्क्याच्या गुन्ह्यातील सागर भांड, रवी लोंढे, नितीन माळी तसेच किरण आजबे व जालिंदर सगळगीळे हे पाच आरोपी खिडकीचे गज कापून पसार झाले होते. सागर भांड, किरण आजबे या दोन आरोपींना राहुरी येथील नगर मनमाड रस्त्यावर पाठलाग करून पकडण्यात आले होते. तर जालिंदर सगळगिळे याला मनमाड येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या सोबत पळालेले रवी पोपट लोंढे व नितीन मच्छिंद्र माळी हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिस पथके त्यांचा शोध घेत आहेत.
आरोपींनी कारागृहातून पलायन केल्याने कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पोलीस उप महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली. याप्रकरणी उप महानिरीक्षक शेखर पाटील यांनी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशी नंतर अधीक्षक पाटील यांनी पोलीस उप निरीक्षक व पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. या घटने बाबत पुढील तपास पोलिस प्रशासनाकडून सुरू आहेत. या कारवाईमुळे पोलिस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.