प्रवरेची रॉकेट देशी विकणाऱ्यांना वाईन बद्दल बोलण्याचा अधिकार नाही

खा. संजय राऊत यांच्यावर टीका करणाऱ्या खा. विखे यांना गिरीश जाधव यांचे प्रत्युत्तर

अहमदनगर (प्रतिनिधी) :  राज्य शासनाच्या वाईन विक्रीच्या धोरणाबाबत विरोधी पक्षाचे खासदार म्हणून विरोध करणे इथंपर्यंत ठीक आहे . परंतु एखादा विषय जर आपणास पटत नसेल तर अगोदर तुमच्या मालकीचे दारू आणि बियर निर्मितीचे कारखाने  बंद करून मगच तोंड उघडावे ,  लोणी येथील आपल्या  मालकीच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या अवसायनीतुन  रॉकेट नावाची देशी दारू आपण तयार करता . त्याची चव चाखून आपण खा. संजय राऊत , दैनिक सामनावर टीका करीत असाल तर  त्याविषयी बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. अशी खरमरीत टीका
शिवसेनेचे नगर उप जिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केली आहे.
        ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या संदर्भामध्ये आज दैनिक सामनामध्ये अग्रलेख प्रसिद्ध झाला . त्यात खा . संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली होती. याबद्दल पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता दैनिक सामानाचे संपादक हे वाईन पियुन अग्रलेख लिहीत असावेत त्यांनी जनतेची माफी मागावी असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.   या वक्तव्याला गिरीश जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे . त्यासाठी त्यांनी पत्रक प्रसिद्धीला दिले आहे.
     त्यात त्यांनी म्हंटले आहे की , राज्य शासनाच्या ध्येय धोरणाबद्दल भाजप खासदार सुजय विखे हे नेहमीच टीका करीत असतात. पण सवंग प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात आणि वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत , चर्चेत यावे या माफक उद्देशाने विखे हे बेताल वक्तव्य करीत आहेत. मध्यंतरी खा . सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य करून तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली तरी देखील तूम्हाला उपरती झाली नाही. हे दुर्दवी आहे.
          स्वतःच्या स्वार्थापोटी  वेळोवेळी संधी साधू दलबदलू राजकारण करणे ही आपल्या घराण्याची खासियत आहे. शिवसेना आणि अन्य व्यक्तीवर विखे पिता पुत्र वारंवार टीका करून तोंड सुख घेत आहेत. पण त्यांची वक्तव्ये ही कंबरेखालील असून नीतिमत्तेला धरून नाहीत . हे टीका करण्या अगोदर विखे घराण्याने अगोदर आपले चारित्र्य तपासावे मगच बोलावे असा सल्ला जाधव यांनी दिला आहे.

तुमच्या कारखान्यात तयार होणारी रॉकेट ही देशी दारू आपण चंद्रपूर येथे दारूबंदी असताना विकत होता . तिथली दारूबंदी उठविण्यासाठी आपण किती आकांड तांडव त्यावेळी केला होता . महाराष्ट्रात मागील काळात दुष्काळ असताना आपल्या औरंगाबाद येथील बियर कंपन्यांना पाणी मिळावे व कंपन्या सुरु रहाव्यात यासाठी  मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी आपण किती खटाटोप केला हे सर्वाना माहित आहे.

      कोरोना काळात रेम डेसिव्हर इंजेक्शन कशा पद्धतीने आपण बेकायदेशीर पणे विळद घाटातील हॉस्पिटलला उपलब्ध करून दिली. याची दाखल उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे. आपल्या अशा मतलबी राजकारणाला आणि बेताल वक्तव्याची दखल नगरची जनता घेत नाही . लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यावर नगरच्या जनतेने परका उमेदवार निवडून दिला या उपकाराची जाणीव न ठेवता आपण सेनेवर टीका करणे नीतीला धरून नाही असा सल्ला जाधव यांनी दिला आहे.