बंदुका धरणार्‍या हातांत लेखणीही हवी -डॉ. बी. जी. शेखर (पोलिस उपमहानिरीक्षक)

साहित्यिक ज्या पध्दतीने आपल्या साहित्यातून समाजप्रबोधनाचे काम करतात, तसेच काम पोलिसही करत असतात. साहित्यिकांना समाजाची नाळ समजलेली असते. त्याच पद्धतीने पोलिसांचे समाजातील सर्वच घटकांशी संबंध येत आल्याने समाज कोणत्या दिशेने चालला आहे, हे पोलिसांना नेमके कळते. त्यावरील उपाययोजनाही माहिती असतात. त्यामुळे पोलिसांच्या हाती बंदुकांसोबतच लेखणी असल्यास ते समाजाला दिशा देऊ शकतात, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी शाखेतर्फे मकर संक्रांतीनिमित्त पोलिस अधिकार्‍यांसोबत साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. शेखर बोलत होते. डॉ. शेखर स्वत: साहित्यिक आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून आणखी काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. राज्यातील पहिल्या पोलिस साहित्य संमेलनाचे डॉ. शेखर अध्यक्ष होते. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्यासोबत नगरच्या साहित्यिकांचा संवाद मसापने घडवून आणला. मसाप, सावेडी शाखा व शांतीकुमार फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशन यांच्या वारसा विशेषांकाची 1001 वी प्रत डॉ. शेखर यांना देण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून प्रतिष्ठेच्या दिवाळी अंक स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घेतलेल्या या अंकाचे शेखर यांनी विशेष कौतुक केले. यावेळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलिस अधिकारी आणि साहित्यिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. शेखर यांनी आपला पोलिस अधिकारी म्हणून आणि साहित्यिक म्हणून आतापर्यंतचा प्रवास कथन केला. या क्षेत्रातील विविध अनुभव त्यांनी सांगितले. वर्दीतील लोकांसाठी साहित्य केवळ आनंददायी नव्हे, तर त्यांचे ते दुसरे शस्त्र ठरू शकते. जे काम शस्त्राच्या बळावर करणे शक्य नाही, ते लेखणीतून साध्य करता येते. साहित्यिक आणि पोलिस यांच्या एकत्रित प्रयत्नातून समाजसुधारणा शक्य आहे, असेही डॉ. शेखर म्हणाले. उपस्थित साहित्यिकांचा त्यांनी व्यक्तीश: परिचय करून घेतला. नगरच्या साहित्य वर्तुळातील दिग्गजांचे कार्य त्यांनी सामजावून घेतले.

राज्य सरकारच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य, मसापच्या सावेडी शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलूलकर यांनी प्रास्ताविक केले. मसापच्या  शाखेच्या वतीने शहरात आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. पोलिस साहित्य संमेलनासारखा उपक्रम नगरला झाला तर त्याला सहकार्य करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. वरिष्ठ पत्रकार विजयसिंह होलम यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विलास गिते, सुरेश चव्हाण, डॉ. लीला गोविलकर, डॉ. सुधाकर कुर्‍हाडे, श्रीधर अंभोरे, सतीश डेरेकर, चंद्रकांत पालवे, शोभा ढेपे, जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष शिरीष मोडक, संभाजी पवार, मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागाचे सचिव मन्सूरभाई शेख, नंदकुमार आढाव, सुदर्शन कुलकर्णी, राजन उत्तेकर, माधवी कुलकर्णी, पद्माकर पवार, ऋषिकेश येलुलकर, आफताब शेख यांनी चर्चेत भाग घेतला.