मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या भ्याड हल्ल्याचा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निषेध

लोणी खुर्द (जि. वाशिम) हल्ल्यातील आरोपींना अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी

महाराष्ट्रात मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या भ्याड हल्ल्याचा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदविण्यात आला. नुकतेच लोणी खुर्द (जि. वाशिम) येथे मातंग समाज बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्यातील सर्व आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष हेमंत खंदारे, भिंगार शहराध्यक्ष अमोल गाडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष राजाराम काळे, केडगाव शहराध्यक्ष अभिजीत सकट, कृष्णा गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील सकट आदी उपस्थित होते.


लोणी खुर्द (जि. वाशिम) येथील मातंग समाज बांधवांवर लहुजी वस्ताद साळवे यांचा फलक लावल्याच्या कारणावरुन गावातील समाजकंटकांनी हल्ला केला. यामध्ये समाजातील वयोवृद्ध, महिला, पुरुष यांना जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी फक्त तीन आरोपी अटक करण्यात आले असून, उर्वरीत आरोपी मोकाट फिरत आहेत. आरोपींना पाठीशी घालणार्‍या सदर प्रकरणातील जबाबदार पोलीस अधिकार्‍याचे निलंबन करावे, सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मागासवर्गीय समाजावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. राजकीय वरदहस्त असल्याने आरोपी मोकाट फिरतात. याचा त्रास सर्वसामान्य मागासवर्गीयांना होत आहे. अशा प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर शासन झाल्यास अशा घटना वारंवार घडणार नाही. सदर प्रकरणी आरोपी अटक न झाल्यास जातीयवादीवृत्तीला खतपाणी घालणार्‍या आघाडी सरकारचा दशक्रियाविधी करुन आंदोलन करण्यात येणार. -सुनिल शिंदे (जिल्हाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना)