युवकांमध्ये परिवर्तन घडविण्याची शक्ती -आमदार निलेश लंके

रक्तदान शिबीरात युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला, व्हॉलीबॉल व व्यसनमुक्तीवर वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. तर विशेष घटक युवक कल्याण प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमातंर्गत झालेल्या रक्तदान शिबीरात युवकांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.
निमगाव वाघा (ता. नगर) येथील न्यू मिलन मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करुन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी औरंगाबादचे सहाय्यक अधिव्याख्याता डॉ. शैलेंद्र भणगे, प्राचार्या गुंफा कोकाटे, लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षा संपुर्णा सावंत, उद्योजक अजय लामखडे, सिने कलाकार आशिष सातपुते, माजी सरपंच साहेबराव बोडखे, सरपंच रुपाली जाधव, उपसरपंच अलका गायकवाड, श्रीकांत मांढरे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक किसन वाबळे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, धर्मवीर वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे, उद्योजक दिलावर शेख, जालिंदर आतकर, भाऊसाहेब ठाणगे, डॉ. विजय जाधव, भागचंद जाधव, सुनिल जाधव, उत्तम कांडेकर, भागचंद जाधव आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे यांनी युवा शक्ती ही देशाची खरी शक्ती असून, त्यांच्या माध्यमातून बदल घडणार आहे. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करुन, सामाजिक कार्याने वंचित घटकांना आधार देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. कोरोना काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी व युवकांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार निलेश लंके म्हणाले की, सर्वसामान्यांना आधार व युवकांना दिशा देण्याचे कार्य डोंगरे संस्था व नवनाथ युवा मंडळाच्या वतीने सुरु आहे. युवकांमध्ये परिवर्तन घडविण्याची शक्ती असून, युवकांनी क्रांती केल्याचा इतिहास आहे. संस्थेच्या माध्यमातून युवकांसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले. युवकांना योग्य दिशा मिळाल्यास समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी डोंगरे संस्था व नवनाथ युवा मंडळाचे सातत्याने सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात कार्य सुरु आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी युवकांना व्यासपीठ निर्माण करुन दिल्याचे सांगितले.
सिने कलाकार आशिष सातपुते यांनी विविध राजकीय पुढार्‍यांचे आवाजासह अभिनय करुन उपस्थितांचे मनोरंजन केले. सोनल तरटे-पवार व कोमल तरटे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. तृप्ती गायकवाड या विद्यार्थिनीने पोवाडे व भक्तीगीत सादर केले. व्यसनमुक्तीवर प्रा. मारुती विठ्ठल शेळके यांनी टांळेबंदीनंतरच्या काळात युवकांमध्ये नैराश्य निर्माण होऊन व्यसनाधिनता वाढली आहे. व्यसनाने अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याचे स्पष्ट करुन व्यसनाचे दुष्परिणाम सांगितले. तसेच व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले.
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍यांना आमदार लंके यांच्या हस्ते गौरविण्यात आले. जिल्हा क्रीडा कार्यालय व नेहरु युवा केंद्राच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. रक्तदानासाठी न्यू अर्पणा व्हॉलंटरी रक्तपेढीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साबळे यांनी केले. आभार संदिप डोंगरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय पवार, अतुल फलके, अतुल पुंड, भाऊसाहेब डोंगरे, प्रतिभा डोंगरे, मयुर काळे, रितेश डोंगरे यांनी परिश्रम घेतले.