रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन क्रॅश कोर्सचा शुभारंभ

कोरोनामुळे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना दहावीची योग्य तयारी करता आली नसून, दहावी पुणे बोर्ड व सीबीएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने मोफत ऑनलाईन क्रॅश कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच ऑनलाइन करण्यात झाला. यावेळी रोटरी इंटिग्रिटीचे अध्यक्ष सुयोग झंवर, चंदना गांधी, के. बालराजू, नानासाहेब बर्‍हाटे उपस्थित होते.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात अनेक अडचणी आल्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, कौटुंबिक समस्या आदी कारणांनी अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी अद्यापि पुरेशी तयारी झालेली नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी रोटरी इंटिग्रिटीने या ऑनलाईन क्रॅश कोर्सचे आयोजन केले आहे. या मार्गदर्शन कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षक मार्गदर्शन करुन पुनरावृत्ती सत्र घेणार आहेत.
दहावी पुणे बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी 14 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत तर सीबीएससी बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी 7 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान 4 ते 6 वाजे पर्यंत मोफत ऑनलाईन क्रॅश कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन कोर्सचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन रोटरी इंटिग्रिटीच्या वतीने करण्यात आले आहे. हा कोर्स मोफत असून रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असल्याचे अध्यक्ष सुयोग झंवर यांनी सांगितले. चंदना गांधी यांनी आभार मानले. अधिक माहितीसाठी 7501988988 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.