वन विभागाच्या त्या लाचखोर वनक्षेत्रपालास कायमस्वरूपी बडतर्फ करावे – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अनेक वेळा लाच प्रकरणात अडकलेल्या वन विभागाच्या लाचखोर वनक्षेत्रपालास कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी यांना सदर मागणीचे निवेदन दिले. संबंधित लाचखोर अधिकार्‍यावर कारवाई न झाल्यास नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर 24 जानेवारी पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.  वन विभागात उपवनसंरक्षक म्हणून सुनील थिटे कार्यरत आहे. नुकतेच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले होते. यापुर्वी देखील या अधिकार्‍यावर अनेकवेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. वन विभागाने अशा बेजबाबदार व लाचखोर अधिकार्‍यास पदनियुक्ती दिलेली आहे. अशा कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची मागणी वनविभागाला करण्यात आली होती. सदर अधिकार्‍याचे मोठ्या अधिकार्‍यांशी अर्थपूर्ण संबंध असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. वन विभागाच्या लाचखोर वनक्षेत्रपालास कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.