वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी नोंदणी झालेल्या पात्र शिक्षकांचे त्वरीत प्रशिक्षण आयोजित करावे -बाबासाहेब बोडखे

लवकरच प्रशिक्षण आयोजन करणार असल्याचे शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालकांचे आश्‍वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण नोंदणी झालेल्या पात्र शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण तातडीने आयोजन करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदच्या संचालकांना पाठविण्यात आले. शिक्षणाधिकारी कडूस यांनी या प्रश्‍नी संचालक रमाकांत काठमोरे यांच्याशी संपर्क साधला असता, काठमोरे यांनी प्रशिक्षण परिषदावरील कार्यवाही पुर्ण झाली असून, लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक होणार आहे. यानंतर लवकरच वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. यावेळी शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, प्रांतीय सदस्य प्रा. सुनिल पंडित, भाऊसाहेब मोरे, बबन शिंदे, संभाजी पवार, सुभाष येवले, दत्तात्रय वाघ, अनिल सुद्रिक, बी.एस. वाघमारे, सी.बी. बर्डे, एम.के. शेख आदी शिक्षक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी पात्र असलेल्या हजारो शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आमदार नागो गाणार, मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर व कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व पात्र प्रशिक्षणार्थी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याचे नियोजन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.
राज्यातील हजारो शिक्षकांनी दिलेल्या मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज व शुल्क भरल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थींनी भरलेल्या अर्जामध्ये नजरचुकीने राहिला काही तांत्रिक बाबींची पुर्तता देखील करण्यात आली आहे. मात्र प्रशिक्षणार्थीकडून आजपर्यंत  प्रशिक्षणासंदर्भात संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाली आहे. तथापि अजूनही प्रशिक्षणाबाबत तारखा जाहीर झालेल्या नाहीत. दि. 16 ते 20 जानेवारीपर्यंत लॉगइन, आयडी व पासवर्ड देणार असल्याचे सोशल मीडियावर माहिती व्हायरल झाली होती. सध्या फेब्रुवारी महिना सुरु झाला असून, ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या शिक्षक, बंधू-भगिनींना अद्यापपर्यंत कोणत्याही स्वरूपाचे संदेश प्राप्त झाले नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण नोंदणी झालेल्या पात्र शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण तातडीने आयोजन करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.