विवाहितेचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला

राहुरी तालूक्यातील वांबोरी परिसरात आज दिनांक १५ डिसेंबर रोजी छाया भूसारे या विवाहित तरूणीचा मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. सदर तरूणीचा घातपात झाला असल्याचा संशय तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय. सासरकडच्या तीन लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
          राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात असलेल्या कुक्कडवेढे येथे आज दिनांक १५ डिसेंबर रोजी सकाळी छाया शिवाजी भुसारे या २८ वर्षीय विवाहित तरुणीचा मृतदेह त्यांच्याच विहिरीत पाण्यावर तरंगताना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

           मयत छाया शिवाजी भूसारे हिचा अनेक महिन्यांपासून सासरचे लोक छळ करून पैशाची मागणी करत होते. माहेरहून पैसे आणावे, म्हणून तिचा मोठ्या प्रमाणावर शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. सासरच्या त्रासा बाबत तिने माहेरच्या लोकांना सांगीतले होते. आज तिचा मृतदेह विहिरीत आढळून आलाय. तिचा घातपात झाल्याचा संशय तिच्या माहेरच्या लोकांनी व्यक्त केलाय. याबाबत पती शिवाजी आसाराम भूसारे, सासरा आसाराम मारूती भूसारे, सासू यमुनाबाई आसाराम भूसारे, नणंद गिताबाई रमेश पंडित या चार लोकांनी मयत छाया हिचा घातपात केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
          राहुरी पोलिसांनी शिवाजी भूसारे, आसाराम भूसारे, यमुनाबाई भूसारे या तिघां जणांना ताबडतोब ताब्यात घेतले आहे. पोलिसात सध्या आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत.