श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या वतीने स्थलांतरित कामगार, मजुरांच्या आरोग्यासाठी योगदान देणार्‍यांचा गौरव

अहमदनगर जिल्ह्यात रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या कंपनी, हॉटेल, बांधकाम, खडीक्रेशर, फेरीवाले, ऊसतोड मजूर व वीटभट्टी कामगार, मजुरांच्या आरोग्यासाठी योगदान देणार्‍यांचा श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, हॉटेल व्यावसायिक डॉ. अविनाश मोरे, स्नायडर कंपनीच्या डेप्युटी मॅनेजर दिपाली टकले, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप, संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अविनाश मोरे म्हणाले की, स्थलांतरीत कामगार समाजाचा एक घटक असून, समाजाच्या विकासात त्यांचे देखील मोठे योगदान आहे. अशा स्थलांतरीत कामगारांसाठी अमृतवाहिनीचे आरोग्य सेवेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी एड्सबद्दल पुरेशी माहिती नसल्याने अशिक्षित कामगार त्याला बळी पडत आहे. सर्वांनी एकत्रित येऊन एड्सबद्दल निसंकोच संवाद साधून व त्याची माहिती घेऊन एड्स रोग नियंत्रणात आनण्याचे त्यांनी आवाहन केले. अमृतदीपच्या प्रकल्प व्यवस्थापिकाशुभांगी माने यांनी स्वलिखीत एकांकिकेमधून एड्सची जनजागृती करुन एड्स कशाने होतो व कशाने होत नाही? याची सविस्तर माहिती दिली.
श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ 2013 पासून अमृतदिप प्रकल्पाच्या माध्यमातून कामगार, मजुरांच्या आरोग्यासाठी योगदान देत आहे. स्थलांतरीत कामगार, मजूरांच्या कामाच्या ठिकाणी किंवा राहत्या ठिकाणी जाऊन सामान्य आजार, गुप्तरोग, एच.आय.व्ही (एड्स), क्षयरोग, आणि इतर संसर्गजन्य आजारांची माहिती देऊन त्यांची तपासणी केली जाते. पथनाट्य, पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. तर कामगारांच्या मागणीवरुन विविध कार्यक्रम आयोजन करुन कामगारांचे समुपदेशन करुन त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. या सामाजिक कार्यासाठी योगदान देणारे कंपन्या, हॉटेल, बांधकाम, विटभट्टी मालक व संचालकांना कृतज्ञतापूर्वक सन्मानाने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी माने यांनी केले. आभार संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सिराज शेख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पल्लवी हिवाळे-तुपे, श्रीकांत शिरसाठ, ऋतिक बर्डे, प्रसाद माळी, अनिल दुधवडे, मच्छिंद्र दुधवडे, कुणाल बर्डे यांनी परिश्रम घेतले.