अनामप्रेमच्या अंध, दिव्यांगांना पंचतारांकित दर्जाच्या हॉटेलची सफर
पैलवान बॉईज ग्रुपचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पैलवान बॉईज ग्रुपने अनामप्रेम संस्थेतील अंध, दिव्यांग विद्यार्थ्यांना एका पंचतारांकित दर्जाच्या हॉटेलची सफर घडवून त्यांना जेवणाची संधी उपलब्ध करुन दिली. नगरसेवक पै. सुभाष लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी हा सामाजिक उपक्रम घडवून आणला.संस्थेतील दररोजचे घरगुती जेवण, वाढदिवस, सण, उत्सवानिमित्त संस्थेला मिळालेले विविध प्रकारचे जेवण व अल्पोपहार मात्र पंचतारांकित दर्जाच्या हॉटेलमध्ये घेऊन जाण्याचे अंध, दिव्यांगांचे स्वप्न पैलवान बॉईज ग्रुपने पूर्ण केले. शहरातील अमरज्योत हॉटेलमध्ये अंध-दिव्यांगांनी पंचपक्वानाचा आस्वाद घेतला. यावेळी पैलवान बॉईज ग्रुपचे अध्यक्ष सोनुभाऊ गीते, पै. मनोज लोंढे, नगरसेवक प्रदीप परदेशी, महेश चव्हाण, सुरज शिंदे, अॅड. अक्षय दांगट, नील गांधी, पै. सुनील कदम, योगेश सोनवणे, पै. संतोष दोमल, सचिन अलचेट्टी, पै. नाना डोंगरे, सचिन क्षीरसागर, दत्ता सोनवणे, ओम काळे, विष्णू कासार, निखिल गांधी, दत्ता कुलट, संतोष दोमल आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सोनुभाऊ गीते म्हणाले की, किती व कोणती मदत केली? यापेक्षा त्यामागची भावना महत्त्वाची ठरते. दिव्यांग विद्यार्थी हे आपल्या समाजातील एक घटक असून, त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. अनेक दिव्यांगांनी परिस्थितीवर मात करुन आपले भवितव्य घडविले आहे. जीवनात अपंगत्वाचा न्यूनगंड न बाळगता ध्येय प्राप्त करण्याचे आवाहन केले. तर अशा सामाजिक उपक्रमासाठी पै. सुभाष लोंढे यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान बॉईज ग्रुपची सामाजिक वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पै. नाना डोंगरे म्हणाले की, लोंढे परिवाराचे सामाजिक व कुस्ती क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी युवकांना दिशा देऊन अनेक चांगले पैलवान घडविले आहेत. जिल्ह्यातील कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी त्यांचे नेहमीच योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक प्रदीप परदेशी यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. पै. मनोज लोंढे यांनी समाजसेवा विचारापेक्षा कृतीत उतरविण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. व्यक्ती आपल्या कामातून मोठा होत असतो, त्याच्या संपत्तीपेक्षा त्याने केलेले सामाजिक कार्याची दखल समाज घेत असल्याचे त्यांनी सांगितले.