अनामप्रेम संस्थेतील अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप
वंचित, दुर्लक्षीत घटकांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित, दुर्लक्षीत घटकांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज आहे. दिव्यांग मुले हे समाजातील घटक असून, त्यांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाने आधार देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दिव्यागांना एका दिवसाच्या मदतीमधून मोठी मदत होणार नसली तरी, हा सामाजिक विचार रुजवला जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. तर गारदे परिवाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
गांधी मैदान येथील अनामप्रेम संस्थेत गारदे परिवाराच्या वतीने अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उद्योग व व्यापार सेलचे अनंत गारदे, ओबीसी सेलचे अमित खामकर, मारुती पवार, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष खलील सय्यद, नितीन गारदे, सचिन गारदे, जान्हवी गारदे, प्रवीण शिंदे, भगवान काटे, डॉ. उध्दब शिंदे, अभिजीत ढाकणे, नंदकिशोर परदेशी, समृद्धी शिंदे, प्रवीण जोशी, अनामप्रेमचे अजित कुलकर्णी, अमृत भुसारे, विकास शिंदे, ज्ञानेश्वर गडाख, निखिल खामकर, संतोष लांडे आदी उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, दिव्यांगांना प्रवाहात आनण्याचे कार्य अनामप्रेम संस्था करीत आहे. दिव्यांगांना संस्थेचा मोठा आधार मिळात असून, त्यांना पायावर उभे करण्याचे प्रेरणादायी कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
अनंत गारदे म्हणाले की, शहराच्या विकासाला चालना देऊन आमदार संग्राम जगताप यांनी नेहमीच दीन-दुबळयांना मदतीचा हात दिला आहे. शहरात युवकांची मोठी फळी उभारुन विकासात्मक चैतन्य निर्माण केले आहे. त्यांचे नेतृत्व विकासाकडे घेऊन जाणारे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी गारदे परिवार सामाजिक भावनेने देत असलेले योगदान प्रेरणादायी असून, नेहमीच त्यांची अंध, दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत मिळत असल्याचे सांगितले.