अहमदनगर जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल बोरुडे यांचा सन्मान

सरकारी सेवेत राहून जालिंदर बोरुडे यांनी दीनदुबळ्यांना दिलेली आरोग्यसेवा प्रेरणादायी आहे. लाखोंच्या संख्येने गरजू घटकांवर त्यांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया घडवून आनल्या. असा कर्मचारी सरकारी सेवत असल्याचे सर्वांना अभिमान असल्याचे प्रतिपादन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रविंद्र कानडे यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते तथा जलसंपदा विभागात कार्यरत असलेले जालिंदर बोरुडे यांना नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीच्या वतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कानडे यांनी बोरुडे यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा हिवतापचे उप अधिकारी डॉ. एस.आर. सावंत, तालुका पर्यवेक्षक प्रसाद टकले (श्रीगोंदा), टी.ई. माळी (संगमनेर), संदीप भिंगारदिवे (राहता), ज्ञानेश्‍वर मोटकर (नेवासा), अतुल कुलकर्णी (कर्जत), टी.पी. थोरात (शेवगाव), विजय वस्तारे (जामखेड), संजय साळवे (अकोले), धर्मा धादवड (पारनेर), ज्ञानेश्‍वर गोसावी (पाथर्डी), नंदराम वाघ (कोपरगाव), आरोग्यसेवक एस.आर. सावंत, रामदास रासकर आदी उपस्थित होते.
पुढे डॉ. कानडे म्हणाले की, आरोग्यसेवा खर्चिक असल्याने सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरची झाली आहे. गरजू व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये, या भावनेने बोरुडे योगदान देत असून, यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारे शासकीय व इतर संस्थेकडून आर्थिक मदत घेतली नाही. वंचितांना आरोग्यसेवा देण्याच्या निस्वार्थ हेतूने सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. जालिंदर बोरुडे यांनी निस्वार्थ भावनेने फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने कार्य सुरु आहे. शासनाची तसेच कोणत्याही संस्थेकडून आर्थिक मदत न घेता गेल्या तीस वर्षापासून मोफत नेत्र शिबीर घेऊन अडीच लाखापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान चळवळीतही कार्य सुरु असून, संस्थेच्या आवहानाला प्रतिसाद देत अनेकांनी केलेल्या मरणोत्तर नेत्रदानातून हजारो दृष्टीहिनांना नवदृष्टी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.