अहमदनगर जिल्ह्यातील एसटी बस 9 डेपो सुरू

अहमदनगर – मागील जवळपास तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले. मात्र, अनेक आगारात अजूनही कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत.
अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 9 डेपो सुरू झालेत, जिल्ह्यात एकूण 3800 कर्मचारी आहेत त्यापैकी 1200 कर्मचारी कामावर रुजू झालेत. या संपादरम्यान जिल्ह्यातील 290 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलंय.निलंबन करण्यात आलेल्यांपैकी 70 कर्मचारी कामावर हजर झालेत. तर 27 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलीये. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात 120 फेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती एसटी विभागाने दिली आहे.मात्र , या अतिशय कमी फेऱ्या असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.खासगी प्रवासी वाहतूकदार त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत.विशेष म्हणजे तारकपूर बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांचे कपडे घातलेला व्यक्ती खासगी वाहन घेऊन प्रवासी घेऊन जाताना दिसून आलाय.त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्ती केली.