अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्गाला मिळणार गती; राज्य सरकारकडून ९० कोटींचा निधी प्राप्त
नुकतीच नगर ते आष्टी रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आलेली आहे. नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.या अंतर्गत नगर ते आष्टी या ६४ किलोमीटर रेल्वेमार्गाचे तसेच पूल, स्टेशन आदी कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. लवकरच नगर-आष्टी या मार्गावर ताशी १४४ किलोमीटर धावणाऱ्या हायस्पीड रेल्वेची चाचणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, या रेल्वेमार्गाच्या कामास केंद्र व राज्य सरकारने ५०-५० टक्के निधी द्यावा, असे निर्देश आहेत. केंद्र शासनाने २०२१-२२ 2साठी २४९ कोटी ८८ लाख रुपये तरतूद केलेली आहे.त्याबाबत मध्य रेल्वेने राज्य शासनास कळविले होते. त्यानुसार राज्य शासनाने आपला हिस्सा पूर्ण करण्यासाठी आज ९० कोटी १३ लाख रुपये खर्चास मंजुरी दिली आहे.त्यामुळे २०२१-२२ या वर्षीच्या प्रस्तावित कामांना गती मिळून विनाअडथळा ही कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.नगर-बीड रेल्वेमार्गासाठी अंदाजे २ हजार ८२६ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी १ हजार ४१३ कोटी एवढा ५० टक्के हिस्सा राज्य शासनाला द्यायचा आहे.