एसटी कर्मचारी कामावर रुजू न झाल्यास उद्यापासून होणार कडक कारवाई

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या आपल्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरु आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आज 23 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. आज रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर उद्यापासून पुन्हा कारवाईला सुरुवात होणार आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अद्यापही ठाम आहेत.

जोपर्यंत विलिनीकरण नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. संपाची नोटीस देणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने सोमवारी संप मागे घेण्याची घोषणा एसटी महामंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर केली.यावेळी निलंबन, बडतर्फी, सेवा समाप्ती कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या याप्रकरच्या कारवाया मागे घेण्यावर देखील चर्चा झाली. निलंबन मागे घेतले जाईल,

मात्र दोन दिवसांमध्ये कामावर रुजू व्हा असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने कर्मचाऱ्यांना करण्यात आले होते. मात्र आज अंतिम मुदत संपत असून देखील कामावर हजर कर्मचाऱ्यांची संख्या कमीच आहे.त्यामुळे जे उद्या कामावर हजर होणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आता राज्य शासनाच्या वतीने देण्यात आला आहे.