अहमदनगर शहरातील सीबीएससी माध्यमांचे तीन केंद्रीय विद्यालये आजपासून सुरू
अहमदनगर – जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी परवानगी दिली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत, पात्र विद्यार्थ्यांनीही लसीचा पहिला डोस घेतलेला असावा, शाळेत येण्यासाठी पालकांचे सहमती पत्र आवश्यक असावे, या अटींवरच शाळेत प्रवेश दिला जात आहे. अहमदनगर शहरातील सीबीएससी माध्यमांचे तीन केंद्रीय विद्यालयेही आजपासून सुरू करण्यात आले आहेत. मात्र अहमदनगर महापालिका आयुक्तांनी अद्याप शहरातील शाळा सुरू करण्यास परवानगी न दिल्याने सीबीएससी वगळता इतर शाळा अजूनही बंदच आहेत.
दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यँतच्या शाळा 2 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.कोरोना रूग्णसंख्या रोखण्यासाठी आणि लसीकरण प्रमाण वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतला. त्यावेळी शाळांची स्थिती, तेथील लसीकरण यांचीही माहिती घेण्यात आली. शाळा सुरू करण्याची मागणी विचारात घेता जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. या निर्णयाची माहिती परवा रात्री उशिरा कळविण्यात आली. त्यामुळे तयारीअभावी काल सकाळी बहुतांश शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. मात्र आज आवश्यक ती पूर्तता केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचा पटदेखील वाढला आहे.
यापूर्वी वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 1 जानेवारीपासून जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या शाळा जिल्हा प्रशासनाने बंद केल्या होत्या. परंतु हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. मध्यंतरी शासनाने शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या मात्र प्रशासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे मंगळवारी दि. 1 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. त्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 3 हजार 569 शाळा, खासगी प्राथमिक 551 शाळा तर माध्यमिक 1 हजार 230 शाळा आहेत. त्यापैकी पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सुरू झाल्या. मात्र पहिल्या दिवशी शाळा सुरू करण्याचा निरोप अनेक पालकांना न मिळाल्याने शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती.
शाळेतील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचेही लसीकरण गरजेचे असून, 15 वयोगटाच्या आतील वय असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे लसीकरण झालेले असावे आणि महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. शाळेतील वर्गखोल्या सॅनिटाईझ करण्यात येत असून विद्यार्थ्यांचे तापमानही घेतले जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रूग्णसंख्या आता एक हजारच्या आसपास स्थिरावली आहे.