अहमदनगर सायकलिंग क्लबतर्फे मॅरेथॉन धावपटूंचा सत्कार
नगरचे नाव जागतिक पातळीवर चमकले-गौरव फिरोदिया
नगर – नगरची ओळख कला, क्रिडा, सांस्कृतिक वारसा जपणारी आहे. ही ओळख जागतिक पातळीवर पोहचवण्याची धमक नगरमधील कलाकार, खेळाडूंमध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत नगरच्या या चार खेळाडूंनी सहभागी होत यश मिळविल्याने नगरचे नाव जागतिक पातळीवर चमकविले आहे. यासाठी अहमदनगर रनर्स क्लबचे गौतम जायभाय, योगेश खरपुडे, जगदीप मकर, विलास भोजने या चौघांनी जी कामगिरी केली ती सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन उद्योजक गौरव फिरोदिया यांनी केले.
नगर क्लब येथे अहमदनगर सायकलिंग क्लबच्यावतीने मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करुन नगरचे नाव जागतिक पातळीवर चमकविल्याबद्दल गौतम जायभाय, योगेश खरपुडे, जगदीप मकर, विलास भोजने यांचा राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी गौरव फिरोदिया, कल्याणी फिरोदिया आदिंसहअहमदनगर रनर्स क्लब व सायकलिंग क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
गौरव फिरोदिया पुढे म्हणाले, या चारही धावपटूंनी अत्यंत खडतर अशा कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत 90 कि.मी. धावण्याची स्पर्धा बारा तासात पूर्ण केली. असेच चांगले खेळाडू नगरमधून राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर नगरचे नाव उंचावत आहेत. भारताचा तिरंगा ध्वजाचा सन्मान वाढवित आहे हे भुषणावह असल्याचे सांगितले.
याप्रसंगी कृष्णप्रकाश म्हणाले, आपली शारीरिक क्षमता चांगली असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत ती पूर्ण करण्यासाठी नगरच्या या चार खेळाडूंनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. या खेळाडूंच्या यशात अहमदनगर रनर्स क्लबचे मोठे योगदान व प्रोत्साहन राहिले आहे. तरुणांनी आपल्या फिटनेसकडे लक्ष देऊन खेळातून आपले व देशाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन केले.
या चारही धावपट्टूंनी सायकलिंग क्लबने केलेल्या सन्मानाबद्दल आभार मानले.