आजादी का अमृत महोत्‍सव उपक्रमानिमित्‍त संरक्षण उपकरण प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्‍न

भारताच्‍या स्‍वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्‍यामुळे आजादी का अमृत महोत्‍सव या उपक्रमानिमित्‍त संरक्षण दलातर्फे वापरण्‍यात येणा-या स्‍थल सेनेच्‍या साहित्‍याची व उपकरणाची माहिती नागरीकांना व्‍हावी या हेतुने वाहन गुणवत्‍ता आश्‍वासक नियंत्रणालय, संरक्षण विभाग, अहमदनगर यांच्‍या वतीने संरक्षण उपकरण प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप, मनपा आयुक्‍त शंकर गोरे, उपमहापोर गणेश भोसले,  वाहन संशोधन विभागाचे सहयोगी संचालक डॉ. जी. एम. राव, वाहन गुणवत्‍ता नियंत्रणलाचे ब्रिगेडियर बी. के. पोखरीयाल यांच्‍या उपस्थित झाले.
आजादी का अमृत महोत्‍सव कार्यक्रमांतर्गत देशभरात ठिकठिकाणी भारतीय लष्‍करांकडुन संरक्षण उपकरणांच्‍या प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात येत आहे. याचाच एक भाग म्‍हणुन अहमदनगर येथील औरंगाबाद रोडवरील, महापालिका कार्यालया शेजारी असलेल्‍या वाहन गुणवत्‍ता आश्‍वासक, नियंत्रणालय परिसरात हे प्रदर्शन 18 व 19 डिसेंबर रोजी सुरू असणार आहे. या प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते 4 पर्यंत असून नागरीकांसाठी खुले आहे.
प्रदर्शनाच्‍या उद्घाटन कार्यक्रमात आ. संग्राम जगताप म्‍हणाले की, संरक्षण प्रदर्शन हे फक्‍त बघण्‍यासाठीच नाही तर शिकण्‍यासाठीही आहे. याचा फायदा विद्यार्थ्‍यांनी करुन घ्‍यावा. नगरवासीयांसाठी हे प्रदर्शन म्‍हणजे संरक्षण विषयक उपकरणांची माहिती करुन घेण्‍यासाठी एक मोठी संधी आहे, असे त्‍यांनी सांगितले.
वाहन संशोधन विभागाचे सहयोगी संचालक डॉ. जी. एम. राव म्‍हणाले, सर्वसामान्‍य नागरीकांना या प्रदर्शनाचा खूप लाभ होणार असुन संरक्षण क्षेत्रात वापरण्‍यात येणा-या विविध उपकरणांची माहिती होईल. वाहन गुणवत्‍ता नियंत्रणालय या संस्‍थेचे भारतीय संरक्षण क्षेत्रामध्‍ये काम महत्‍वपुर्ण आहे. ब्रिगेडीयर पोखरीयाल यांनी प्रास्‍ताविकात संगठणाबाबत आणि प्रदर्शन आयोजना बाबत सविस्‍तर माहिती सांगितली. या कार्यक्रमाला कर्नल रॉबिन मेडक, कर्नल ओ.पी. भारती, प्रशासकीय अधिकारी आर. के. स्‍वामी, राष्‍ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि नागरीक उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्‍ये विविध प्रकारचे संरक्षण साहित्‍य, रणगाडे, लढाऊ लष्‍करी वाहने, दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या वेळी वापरण्‍यात येणारी अत्‍याधुनिक यंत्रणेने सज्‍ज असलेली वाहने, युध्‍दामध्‍ये वापरण्‍यात येणारी वाहने व कमी वेळात अंथरता येतील असे पूल, न्‍युक्लियर तसेच जैव रसायनिक अस्‍त्रांपासुन सुरक्षित असणारे लष्‍करी साहित्‍यांचा या प्रदर्शनात समावेश आहे.