आमदार संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करा

भाजप आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमदार संग्राम जगताप व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी जो काही धिंगाणा घातला, गोंधळ घातला, तो निषेधार्थ आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. तरी आमदार जगताप यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी पुढाकार घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे नगरमध्ये रविवारी लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या कार्यक्रमात वाजवण्यात आलेल्या हिंदी गाण्यावरून जोरदार वाद सुरू झाला आहे. शिवसेना काँग्रेसने राष्ट्रवादीवर टीका केली आहे. तर भाजपनेही आता या वादात उडी घेतली आहे. आज भाजपने पत्रकार परिषद घेत जगताप यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड, ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

लोढा म्हणाले,’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर लावण्यात आलेल्या गाण्यावरचा लोकप्रतिनिधीचा डान्स सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. महाराजांच्या पुतळ्यासमोर अशा पद्धतीने जो काही धिंगाणा आमदार व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी घातला तो निषेधार्थ आहे. विशेष म्हणजे प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. तरी हिंदुस्थानच्या दैवतासमोर गोंधळ घालणार्‍या आमदार व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी पुढाकार घेत करावा,’ अशी मागणी त्यांनी केली.

तर, आगरकर म्हणाले, ‘शहराचे लोकप्रतिनिधी (संग्राम जगताप) यांनी अखंड हिंदू समाजाचा विश्वासघात केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जी गाणे लावत लोकप्रतिनिधी तेथे नाचतात ते अतिशय घृणास्पद आहे. ज्यांना छत्रपतींचा इतिहास माहिती नाही, अशा लोकांच्या ताब्यात शहराची सूत्रे आहेत, ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद गोष्ट आहे,’ असा घणाघाती आरोपही आगरकर यांनी केला.