आरपीआयचे पोलिस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण
पाईपलाईन रोड, समर्थ नगर येथील मोठा भूखंड खाली करण्यासाठी शहरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाने एका गुंड प्रवृत्तीच्या महिलेला सुपारी दिली असून, बांधकाम व्यावसायिकाने तब्बल 15 कोटीचा काळा पैसा चलनात आनण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकारी हाताशी धरले असल्याचा आरोप करुन सदर प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्याच्या मागणीसाठी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण सुरु केले आहे. सदर प्रकरण उघडकीस आनल्याप्रकरणी जीवितास धोका निर्माण झाले असल्याने पोलिस संरक्षण मिळण्याची मागणी देखील केली आहे. या उपोषणात आरपीआयचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष अजिम खान, आरपीआय (आठवले) मराठा आघाडीचे सिध्दार्थ सिसोदे, तालुका युवक कार्याध्यक्ष संदीप वाघचौरे, मुन्ना भिंगारदिवे आदी सहभागी झाले होते.
पाईपलाईन रोड, समर्थ नगर येथील जागेचा व्यवहार एका नामांकित बांधकाम व्यावसायिक व गुंड प्रवृत्तीची महिला आणि त्याच्या साथीदारासह झाला. व्यवहार झाल्यानंतर जागा खाली करण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या महिलेच्या नावे बांधकाम व्यावसायिकाने नोटरी साठेखत करुन दिली. सदर जागा खाली करण्यासाठी एकप्रकारे सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात सुपारी देणारे भूमी अभिलेख कार्यालयातील दोन मोठे अधिकारी मध्यस्थी आहे. बांधकाम व्यावसायिकाने 15 कोटी रुपयाचा ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी सदर अधिकारी हाताशी धरण्यात आले. त्यांनी सदर बांधकाम व्यावसायिकाकडे सुपारी घेणार्यांना घेऊन गेले. जागा खाली करण्यासाठी त्यांना 25 लाख रुपये देण्यात आले असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरपीआयने आवाज उठविल्यानंतर काही दिवसानंतर सुपारी घेणार्यांचे पितळ उघडे पडले. सर्व सत्य परिस्थिती लोकांच्या समोर आली. सुपारी घेणारे एका गुंडावर तडीपारचा प्रस्ताव असून, त्याला नोटीस आली असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्यात आपापसात वाद सुरू झाले. या प्रकरणात हस्तक्षेप करुन सत्य समोर आनल्यामुळे सबंधित व्यक्तींकडून जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या सर्व प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखे मार्फत करण्यात यावा, मध्यस्थी करणारे दोन अधिकारी कोण? याचा देखील तपास करावा, बांधकाम व्यावसायिकाने एवढा मोठा काळा पैसा आनला कोठून याचा तपास करण्याच्या मागणीसाठी आरपीआयच्या वतीने उपोषण करण्यात आले आहे.