उलट्या बाजूने बसवलेल्या शिलालेखाने राजमुद्रेचा अवमान

पारनेर तालुक्यातील मार्ग क्रमांक 5054 मध्ये पुलाचे काम करुन लावण्यात आलेल्या उलट्या शिलालेखात राजमुद्रेचा अवमान केल्याबद्दल संबंधित ठेकेदार व अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पारनेर शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेले राज्य मार्ग 5054 वर सन 2017-18 च्या अर्थसंकल्पनेतून 63.77 लाख रुपये पुलाच्या कामासाठी खर्च करण्यात आले होते. परंतु झालेल्या कामाचा शिलालेख उलट्या बाजूने बसवून राजमुद्रेचा अवमान झाला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे पारनेर नगरपंचायत निवडणूक सध्या सुरु असून, आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक अधिकारी यांनी फलक झाकला आहे. तरी देखील हा शिलालेख विरुद्ध दिशेने लावल्याचे निदर्शनास आलेले नाही. प्रशासन फक्त झोपेचे सोंग घेऊ पाहत आहे. संबंधित ठेकेदार फक्त बिले काढण्यासाठी कामे करुन प्रशासकीय कार्यालयात हेलपाटे मारतात. झालेल्या कामाची काळजी फक्त सर्वसामान्य जनतेला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. पुलाचे काम करुन लावण्यात आलेल्या शिलालेखात राजमुद्रेचा अवमान केल्याबद्दल संबंधित ठेकेदार व अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सबंधितांवर कारवाई न झाल्यास पारनेर तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.