एमआयडीसीच्या त्या कंपनीबाहेर 40 कामगार देत आहे, मागील दीड महिन्यापासून ठिय्या

कामगार न्यायालयात गेले कायम होण्यासाठी, अन कंपनीने दाखवला घरचा रस्ता

कंपनीच्या विरोधात न्यायालयात गेलेल्या कामगारांच्या बाजूने निकाल लागल्याने एमआयडीसीच्या त्या कंपनीने कामगारांना थेट घरचा रस्ता दाखवला आहे. कंपनीचे तब्बल 40 कामगार कामासाठी दीड महिन्यापासून कामावर घेण्यासाठी ठिय्या देत असून, या कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची कुर्‍हाड कोसळली आहे. कामावर रुजू करुन न घेतल्यास सर्व कामगार कंपनीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.
एमआयडीसी येथील क्लासिक व्हिल कंपनीच्या चाळीस कामगारांनी कामगारांना कायम करून घेण्यासाठी कामगार न्यायालयात जुलै 2013 मध्ये दावा दाखल केला होता. याच्यावर सुनावणी होऊन कामगार न्यायालयाने 7 डिसेंबर 2021 रोजी न्याय मागणार्‍या कामगारांना कायम कामगारांचे फायदे, दर्जा व अनुसंघिक लाभ देण्याचे आदेश देऊन, कंपनीला पुढील तीन महिन्यात याबाबतची पुर्तता करण्याचे स्पष्ट केले आहे. मात्र न्याय मागण्यासाठी न्यायालयात गेलेल्या कामगारांच्या बाजूने निकाल लागला याचा राग धरुन कंपनीच्या प्रशासनाने त्या 40 कामगारांना कंपनीत येण्यापासून रोखले आहे. त्यांना कामावरून कमी करुन वेतन देनेही बंद केले असल्याचा कामगारांनी आरोप आहे.
कामावरुन कमी केलेल्या या कामगारांना पुन्हा सेवेत घेऊन कामगार न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे लाभ देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून कंपनीच्या प्रवेशद्वारात कामावरुन कमी केलेले कामगार दररोज कंपनीच्या वेळेत ठिय्या देत आहेत. मनसेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे, मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण, कार्याध्यक्ष बाळकृष्ण धुरी, राज्य चिटणीस सचिन जाधव व अहमदनगर उपचिटणीस नंदू गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरु आहे. कंपनीने कामावरुन कमी केलेले सर्व कामगार कंपनीत वेळेवर येत असून, त्यांना कंपनेने काम देण्यास नकार दिला आहे. या कामगारांऐवजी कंत्राटी कामगारांकडून काम करून घेतले जात आहे. यामुळे कामगारांना कामाच्या वेळेत कंपनी बाहेर बसून राहावे लागत आहे. कंपनी व्यवस्थापनाने कामगार न्यायालयाचे अंतिम निकालावर कारवाई करून सभासद कामगारांना न्याय देणे आवश्यक होते. परंतु उलटपक्षी कामगारांना कामावरुन काढून अन्याय करण्यात आला आहे. या कामगारांवर त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे युनियनचे युनिट अध्यक्ष रामेश्‍वर खेडकर व सदस्य योगेश कडूस यांनी सांगितले आहे.