कामगाराचा सेप्टीक टँकेत बुडून मृत्यू प्रकरणी त्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
दारु पाजून सेप्टीक टँकमध्ये स्वच्छतेसाठी ठेकेदाराने उतरविल्याचा आरोप
निंबळक (ता. नगर) येथे सेप्टीक टँक मध्ये अरुण साठे या कामगाराचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागापूर एम.आय.डि.सी. हमाल पंचायत वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. कामगाराला दारु पाजून सेप्टीक टँक मध्ये स्वच्छतेसाठी ठेकेदाराने उतरविल्याचा आरोप मयत मुलाची वृध्द आई व त्याच्या बरोबर घटनास्थळी असलेल्या साथीदाराने केला असून, फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी मयत मुलाची आई अंजना साठे, महादेव शिंदे, फाऊंडेशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड, दिपक नेटके उपस्थित होते.
मयत अरुण श्रीधर साठे (वय 53 वर्षे, रा. नागापूर) व त्याचा मित्र महादेव शिंदे (रा. नागापूर) संतोष पवळे या ठेकेदाराकडे भरलेल्या संडासच्या सेप्टीक टँकचे टाक्या उपसण्यासाठी व इतर मजुरी करण्यासाठी कामाला होते. 26 डिसेंबर रोजी संबंधित ठेकेदाराने दोन्ही कामगारांना निंबळक येथे सेफ्टी टँक सफाईसाठी घेऊन गेला होता. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता पोलिसांचा फोन येऊन त्यांनी मुलाची विचारपूस केली. त्यानंतर मुलगी शारदा मांगरे हिने अरुणला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असल्याचे सांगितले. त्याला जिल्हा रुग्णालयात पहाण्यासाठी गेले असता, तो मृत अवस्थेत आढळला. त्यावेळी तेथील पोलीस व डॉक्टरांनी तुमचा मुलगा अरुण साठे संडास टाकी साफ करताना बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी अंत्यविधी झाल्यानंतर कम्पलेट देण्यासाठी पोलीस स्टेशनला येण्याचे सांगितले. मात्र तक्रार देण्यास गेलो असता तेथून हाकलून लावले जात असून, सदर प्रकरणी पोलीसांनी ठेकेदाराला वाचविण्यासाठी चुकीचा पंचनामा केला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
मयत अरुण साठे बरोबर असलेल्या त्याचा साथीदार महादेव शिंदे याने देखील सेप्टीक टँक मध्ये उतरण्यास अत्यंत कमी रुंदीची जागा असल्याने त्यामध्ये उतरण्यास नकार दिला होता. मात्र ठेकेदाराने कामाचे पैसे मिळणार नसल्याचे स्पष्ट करुन दारु पाजली व त्यानंतर बळजबरीने त्या टँकमध्ये उतरण्यास भाग पाडल्याचे म्हंटले आहे. तरी सदर प्रकरणी कामगाराच्या मृत्यूस जबाबदार असणार्या व मयत मुलाच्या वृध्द आईला न्याय मिळण्यासाठी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागापूर एम.आय.डि.सी. हमाल पंचायत वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा 10 फेब्रुवारीपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.