कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रशासन अ‍ॅक्शन मुड मध्ये

जामखेड — महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या ही तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने धोक्याची घंटा मानली जात आहे. दोन दिवसात रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झालेली आहे. दुसऱ्या लाटेपासून आतापर्यंत जामखेड प्रशासन मास्क न वापरणाऱ्यावर कुठेही कारवाई करताना दिसले नव्हते. मात्र, आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटे मुळे कोरोनाच्या पेशंटची वाढती संख्या व भितीमुळे जामखेड पोलीस स्टेशन व जामखेड नगर परिषदेच्या वतीने संयुक्तरित्या दंडात्मक कारवाईस सुरूवात करण्यात आली असून ही कारवाई कठोरपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कोरोना व ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देशासह महाराष्ट्र राज्यात वाढत जाणारा प्रभाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार गंभीर पावले उचलत आहे. गुरुवारी जामखेड शहरातील खर्डा चौक, बाजारपेठ येथे तहसिलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी कारवाई मोहिम सुरू केली आहे.

कारवाई खर्डा चौकातून सुरू झाली असून संपूर्ण शहरात राबविण्यात येत आहे. यावेळी पोलीस व नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने कारवाई करत असल्याचे गुरुवारी दिसून आले. यावेळी तहसिलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, कार्यालयीन अधिक्षक पिसाळ, आरोग्य विभागाचे प्रमोद टेकाळे, शाम जाधवर , वैभव कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान शहरातील विना मास्क वाहन धारक व व्यवसायिक यांचेकडून मोठा दंड वसूल करण्यात येत आहे. नागरिकांनी रस्त्यावर येताना विना मास्क येऊ नये अन्यथा दंड होवू शकतो, असे जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी स्पष्ट केले.