कोरोनाने शाळा बंद अन पंतगोत्सवाकडे युवकांची धाव

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक शाळांमध्ये प्रत्यक्ष हजर राहण्यास निर्बंध आले असताना शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मकरसंक्रांत निमित्त शालेय विद्यार्थी व युवकांनी पतंगोत्सवाच्या तयारीकडे धाव घेतली आहे. सोमवारी (दि.10 जानेवारी) पतंग, मांजा खरेदी करण्यासाठी शालेय विद्यार्थी व युवकांची शहरात गर्दी दिसून आली.
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकरसंक्रांतीला शहरात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. शाळांना सुट्ट्या जाहीर झाले असताना पतंग आणि मांजाचा बाजार तेजीत आहे. शहरातील झेंडीगेट व बागडपट्टी भागात ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांची दुकाने थाटली गेली आहे. विविध रंग, आकारात कागदी व प्लॅस्टिकचे आकर्षक पतंग युवकांचे लक्ष वेधून घेत आहे. नायलॉन मांजावर प्रतिबंध आल्याने विक्रेत्यांनाही बरेली व पांडा मांजाला प्राधान्य दिले आहे. तयार मांजाची चक्री दीडशे ते हजार रुपयापर्यंत विक्री होत आहे. पतंग देखील पाच ते तीस रुपया पर्यंत उपलब्ध आहे. मकरसंक्रांतीला बालकांपासून वयस्कांपर्यंत प्रत्येक जण संक्रांतीला पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात. शहरात पतंगाची मोठी बाजारपेठ असल्यामुळे तालुकास्तरावरील नागरिकही पतंग, माजा खरेदीसाठी शहरात येण्यास पसंती देत असल्याची माहिती शहरातील जुने पतंग व्यावसायिक रोहिदास चिपोळे यांनी दिली.