चंदनापुरी येथे परप्रांतीय व्यावसायिकाचा खून

संगमनेर : शहरालगत असलेल्या चंदनापुरी येथे जावळे वस्तीनजीक पंक्चरचे दुकान चालविणाऱ्या परप्रांतीय तरुण व्यावसायिकाचा खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे . हा खून कोणी व कशासाठी केला , याचा उलगडा पोलीस करीत आहेत . घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर , संगमनेरचे उपाधीक्षक राहुल मदने , स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्यासह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .
 
अब्दुल मोहम्मद युनूस कादिर ( वय २७ वर्षे , रा . काजीपूर , बिहार ) यांचे चंदनापुरी शिवारातील तीन जावळे वस्तीनजीक वाहनांचे पंक्चर काढण्याचे दुकान आहे . सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दुकानाचा मालक दुकानामध्ये अस्ताव्यस्त स्थितीत आढळून आला . पाहणाऱ्याने याची माहिती चंदनापुरीचे पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे यांना दिली . पोलीस पाटलांनी घटनास्थळी येत पाहणी केली असता दुकानदार मयत असल्याचे त्यांना आढळून आले . त्यांनी पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्याशी संपर्क करून त्यांना ही माहिती सांगितली . पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता मृत व्यक्तीच्या डोक्याला इजा झाल्याचे आढळून आले तसेच घटनास्थळी लोखंडी टामी व एक सुरा आढळून आला आहे . त्यामुळे संबंधित व्यक्तीचा खून झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला असून यासंदर्भात संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार करत आहेत .