जन शिक्षण संस्थेत युवतींनी केली योगासने; आंतरराष्ट्रीय योग दिवसचा उपक्रम

योगाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते -बाळासाहेब पवार

अहमदनगर (प्रतिनिधी)- कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय संचलित नालेगाव येथील जन शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेत झालेल्या योग कार्यक्रमात युवतींसह महिलांनी सहभाग नोंदवून योग व प्राणायामाचे धडे गिरवले.
निरोगी जीवनाचा संदेश देत हा उपक्रम पार पडला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक सुभाष गड्डम यांनी योग व प्राणायामाचे महत्त्व सांगून उपस्थित युवती व महिलांकडून योगासने प्रात्यक्षिकासह करुन घेतली. यावेळी जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, ममता गड्डम, बार्टीच्या समतादूत प्रेरणा विधाते, कार्यक्रम सल्लागार समितीच्या सदस्या कमल पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, प्रशिक्षिका मंगल चौधरी, माधुरी घाटविसावे, लेखापाल अनिल तांदळे आदींसह प्रशिक्षिका, महिला व युवती उपस्थित होत्या.
बाळासाहेब पवार यांनी योगाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन दैनंदिन जीवनातील कार्यक्षमता वाढत  असल्याचे सांगून, जनशिक्षण संस्थेत 2005 पासून महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने सुरु असलेल्या महिलांच्या व्यावसायिक प्रशिक्षण कोर्सची माहिती दिली. तर निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व सांगितले. सुभाष गड्डम यांनी योग व ध्यानने शरीर व मनावर नियंत्रण मिळवता येते. शरीर व मनावर नियंत्रण असल्यास असाध्य गोष्टी सहज करता येऊ शकतात. धकाधकीच्या जीवनात मनावरील ताण कमी करण्यासाठी योग व प्राणायाम काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले. अत्यंत सोप्या पध्दतीने योग व प्राणायाम शिकवल्याबद्दल संस्थेच्या वतीने गड्डम यांचा सत्कार करण्यात आला.जी 20 जनभागीदारी योजनेतंर्गत जन शिक्षण संस्थेच्या जिल्ह्यातील विविध केंद्रात 1 जून ते 15 जून दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना व सहभागींना प्रमाणपत्राचे वितरण यावेळी करण्यात आले.