जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृध्दाश्रमाच्या दिंडीचे भिंगारला उत्साहात स्वागत
निराधार अनाथांच्या सेवाकार्याने या दिंडीत साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडत आहे -विजय भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृध्दाश्रमची आषाढी वारीसाठी अनाथ मुले व वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसह पंढरपूरला निघालेल्या दिंडीचे भिंगारमध्ये सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग व ह.भ.प. अॅड. सुनिल महाराज तोडकर यांनी स्वागत केले.
अनाथ व वृध्दाश्रमचे संस्थापक असलेले तपस्वी स्वामी वासुदेव नंदगिरी (बहरुपी) महाराज यांचे पूजन करुन दिंडी प्रमुख, विणेकरी व चोपदार यांचा फेटे बांधून एकाच पुष्पहारात सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे नेते वसंत लोढा, दिंडी चालक तथा आश्रमचे सचिव ह.भ.प. दिलीप गुंजाळ, संतोष बोबडे, विणेकरी गणेश महाराज देवरे, देवदत्त शेंडे, नामदेव शास्त्री महाराज, पवार महाराज आदींसह वारकरी, टाळकरी व भजनी मंडळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नाशिक जिल्ह्यातील लासळगाव येथे तपस्वी स्वामी वासुदेवनंदगिरी (बहरुपी) महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम व वृध्दाश्रम चालवला जात आहे. आश्रमच्या माध्यमातून 102 मुलींचे तर 58 अनाथ मुलांचे विवाह करण्यात आले असून, सध्या आश्रमात अनाथ मुले-मुली व वृध्दांचे सरकारी अनुदान नसताना पालण पोषण केले जात आहे. आश्रमातील अनेक अनाथ मुले हभप व किर्तनकार झाले आहे. तर शिक्षण घेऊन विविध ठिकाणी नोकरी लागलेले आहे. दरवर्षी अनाथ मुले व ज्येष्ठ नागरिकांसह आषाढीच्या वारीसाठी दिंडी काढण्यात येत असल्याची माहिती ह.भ.प. दिलीप महाराज गुंजाळ यांनी दिली.
स्वामी वासुदेवनंदगिरी (बहरुपी) महाराज यांनी जगात माणुसकी हा सर्वात मोठा धर्म असून, वंचित, अनाथांसाठी आश्रमचे दारे उघडे आहेत. अनेक अनाथ बालकांना आधार देऊन त्यांना घडविण्यासह त्यांचे लग्न लावण्यापर्यंत कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
विजय भालसिंग म्हणाले की, आश्रमच्या माध्यामातून दीन-दुबळ्यांची सुरु असलेली सेवा प्रेरणादायी आहे. माणुसकीच्या भावनेने सुरु असलेले सेवा कार्य पाहून या दिंडीत साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडत असून, या दिंडीतून धार्मिकतेला सामाजिकतेची जोड असल्याचे त्यांनी सांगितले.
ह.भ.प. देवदत्त शेंडे यांच्या वतीने मागील 19 वर्षापासून भिंगारमध्ये या दिंडीच्या जेवणाची उत्तम सोय करत असतात. यावेळी दिंडीतील वारकरी व मुलांना शेंडे यांच्या वतीने उपवासाचे जेवण व सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांच्या वतीने फळांचे वाटप करण्यात आले.