जिल्ह्याच्या साहित्य चळवळीत चांगले योगदान देऊ -किशोर मरकड.

महाराष्ट्र साहित्य परिषद, अहमदनगर शाखेच्या अध्यक्षपदी माझी निवड म्हणजे आपल्या सर्वांची निवड आहे. त्यामुळे हा सत्कार केवळ माझा एकट्याचा नसून सर्व साहित्यिक व साहित्य रसिकांचा आहे. आगामी काळात शब्दगंध सोबत जोडून घेऊन साहित्यिक चळवळीला चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन मसाप अहमदनगर शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर मरकड यांनी केले.
 
मसाप अहमदनगर शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किशोर मरकड यांचा शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालय येथे साहित्य रसिक उद्योजक सुरेश चव्हाण यांच्या हस्ते व प्रा.शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली शाल, पुष्पगुच्छ,पुस्तकं व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे,शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे,खजिनदार भगवान राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रा. शिरीष मोडक म्हणाले की,  कालचे विद्यार्थी किशोर मरकड यांची महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाली, याचा मला सार्थ अभिमान आहे. इथून पुढे मसाप, शब्दगंध व अहमदनगर जिल्हा वाचनालय असा त्रिवेणी संगम साधून नगर जिल्ह्यातील साहित्यिक चळवळीला नवी दिशा देऊ. 
 
डॉ. संजय कळमकर म्हणाले, महाराष्ट्र साहित्य परिषदेने केवळ उत्सवी कार्यक्रम न करता, साहित्य क्षेत्रात सातत्याने काम करावे. साहित्यिकांना पाठबळ द्यावे. शब्दगंध ने मसापच्या अध्यक्षांचा सत्कार करणे म्हणजे धाकट्या सुनेने थोरल्या सूनेचा केलेला सत्कार आहे, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
 
यावेळी कवी चंद्रकांत पालवे, सुरेश चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मसाप अहमदनगर शाखेच्या वतीने किशोर मरकड यांनी शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सुनिल गोसावी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
 
सुनिल गोसावी यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमास प्रा. डॉ. चं. वि. जोशी, दशरथ खोसे, डॉ. क्रांतीकला अनभुले, प्रा. शिवाजी साबळे, गणेश भगत, नसीर शेख, राजेंद्र चोभे, श्रीनिवास बोज्जा, संदीप रोडे, किशोर डोंगरे, सुभाष सोनवणे, बबनराव गिरी, प्रा.राजेंद्र देवढे,अरविंद ब्राम्हणे,प्रा,तुकाराम गोंदकर,पोपट धामणे आदी उपस्थित होते.