डॉ. अभय बंग, राणी बंग यांना शाहू पुरस्कार जाहीर
जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा : २६ जून रोजी वितरण
कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून देण्यात येणारा २०२३ या वर्षीचा राजर्षी शाहू हा पुरस्कार जेष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना देण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केली. हा पुरस्कार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली २६ जून रोजी शाहू स्मारक भवन येथे प्रदान करण्यात येणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय, सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला राजर्षी शाहू पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी २६ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता हा पुरस्कार सोहळा होणार आहे. डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांनी वैद्यकीय क्षेत्रातील समाजसेवा, दारूबंदी चळवळ, आदिवासी समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच डॉ. अभय बंग व राणी बंग यांनि द लेसेन्ट सारख्या वैश्विक प्रतिष्ठेच्या संशोधन नियतकालिकासह विविध प्रतिष्ठित नियतकालिजकात ग्रामीण आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य, बाल आरोग्य अशा विषयावर ३८ शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. शाहू जयंती उत्सवानिमित्त२१ ते २५ जून या पाच दिवसांच्या कालावधीत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली आहे.