नगर(प्रतिनिधी) : अर्बन बँकेतील सुमारे 22 कोटींच्या फसवणूक प्रकरणी डॉ. नीलेश शेळकेसह तिघा डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने शेळकेला 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.
याशिवाय डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे या डॉक्टरांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
डॉ. शेळके हा इतर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. बँकेचे व्यवस्थापक महादेव साळवे यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानुसार डॉ. नीलेश शेळके, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे, निर्मल एजन्सीचे योगेश मालपाणी, स्पंदन हेल्थकेअरचे जगदीश कदम यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. नगर अर्बन बँकेतून डॉ.शेळके, डॉ. सिनारे, डॉ. श्रीखंडे यांच्या नावावर प्रत्येकी 5 कोटी व डॉ. कवडे यांच्या नावावर 7 कोटी 90 लाखांचे कर्ज घेण्यात आले होते.
मशिनरी खरेदीसाठी कर्ज घेण्यात आले. मात्र, या रकमेतून मशिनरी खरेदी न करता कर्जाची रक्कम इतरत्र वापरल्याने बँकेची फसवणूक झाल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला होता.