नगरचे झाले महाबळेश्वर ; तापमान 16 अंशावर
गुरुवारी पहाटे झालेला जोरदार पाऊस आणि थंडगार वाऱ्याने संपूर्ण जिल्हा कुडकुडला आहे . दिवसभर दाट धुके , सूर्यदर्शन नाही , रिमझिम पाऊस , अधुनमधुन कानटोप्या , स्वेटर , रेनकोट घातलेले नागरीक असेच चित्र नगरमध्ये पहायला मिळाले . त्यामुळे नगरमध्ये महाबळेश्वर झाल्याचे चित्र होते . जिल्ह्यातील किमान सरासरी तापमान १६ अंशावर आले आहे . जिल्ह्यात मध्यरात्री एकूण २१.८ मिमी इतका सरासरी पाऊस झाला . ऐन हिवाळ्यात झालेल्या पावसाने थंडीचाही जोर वाढला आहे . नागरिकांनी स्वेटरसह रेनकोटचाही वापर सुरु केला आहे . अरबी समुद्र ते लक्षद्वीप बेट समूह ते उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात सगळीकडेच वाऱ्यासह पाऊस सुरू आहे.
जिल्ह्यात तापमानाचा पारा ही १६.८ अंशापर्यंत खाली आला आहे . तज्ज्ञांच्या मते हा पारा ११ ते १२ अंशापर्यंत खाली आलेला आहे . त्यामुळे जिल्ह्यात गार वारा , थंडीने जोर धरला आहे . ढगाळ हवामानासोबत दिवसभर पावसाची भुरभुर , गार वारा यामुळे ही थंडी वाढली आहे . गुरुवारी दिवसभर नगर शहरात दाट धुके होते . त्यामुळे समोरचे काही दिसत नव्हते . नगरचे महाबळेश्वर झाल्याचे संदेशही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले .