नागरिकांना व्यायाम करण्यासाठी व फिरण्यासाठी भिंगारचे उद्यान खुले करा

उद्यान बंद असल्याने नागरिकांना व्यायाम करण्यास व फिरण्यास अडचण

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने भिंगार मधील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क सुरु करण्याची मागणी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन भिंगार छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना देण्यात आले. यावेळी हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, जालिंदर बोरुडे, अभिजीत सपकाळ, दिपक बडदे, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, संतोष हजारे, अशोक पराते, सलाबत खान, धनंजय नामदे, प्रसाद भिंगारदिवे, मेजर दिलीप ठोकळ, अविनाश जाधव, पोपट भांड, सुमेश केदारे, महेश नामदे, सिमित शिंदे, प्रविण सपकाळ, रविंद्र धडसिंग, पोपट नगरे आदी उपस्थित होते.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना, अनेक निर्बंध शिथिल होत आहे. मात्र उद्याने बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना सकाळ, संध्याकाळी व्यायाम व फिरण्यास अडचण निर्माण होत आहे. भिंगारच्या गौतम बुध्द जॉगिंग पार्क मध्ये शहरासह भिंगार परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सकाळी व्यायाम करण्यासाठी व फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी व सदृढ राहण्यास मदत होते. मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे हे उद्यान बंद असून, नागरिकांना व्यायाम करण्यास अडचण येत आहे. कोरोना महामारीच्या सध्याच्या परिस्थितीत नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहणे आवश्यक आहे. भिंगार शहरात कोरोनाचे रुग्ण कमी असून रुग्णालयात उपचार घेणार्‍यांची संख्या अत्यल्प असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. कोरोनाचे संक्रमण कमी असताना व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने भिंगार छावणी परिषदेचे भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क नागरिकांसाठी खुला करण्याची मागणी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.