नेप्ती उपबाजार समितीच्या नियोजनशून्य कारभाराचा शेतकरी व्यापार्‍यांना फटका

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीच्या नियोजनशून्य कारभारामुळे व्यापारी व शेतकर्‍यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  नेप्ती उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून, लिलावाच्या दिवशी नियोजनाचा फज्जा उडत आहे. शेतकर्‍यांनी आनलेला कांदा बाजार समितीच्या पार्किंग व रस्त्यावर ठेवावा लागत आहे. तर खेरेदी-विक्रीसाठी आलेल्या वाहनामुळे संपुर्ण बाह्यवळण रस्त्यावर लिलावाच्या दिवशी वाहतुक कोंडीचा सामना शेतकरी व ग्राहक वर्गाला करावा लागत आहे.
कोरोनानंतर नेप्ती उपबाजार समितीत दिवसंदिवस मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. अनेक जिल्ह्यातून कांद्याची आवक होत असून, नेप्ती कांदा विभागात फक्त विक्रीसाठी एकच सेल हॉल उपलब्ध आहे. या सेल हॉलच्या क्षमतेच्या पाचपट अधिक कांदा बाजारात दाखल होत आहे. नाईलाजाने आलेला कांदा पार्किंग व रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे उतरवावा लागत आहे. सोमवार, गुरुवार व शनिवारी लिलावाच्या दिवशी उपबाजार समितीमध्ये एकाचवेळी शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी आनलेले वाहन व ग्राहकाने घेतलेला कांदा भरुन बाहेर पडणारे वाहनामुळे दिवसभर वाहतुक कोंडी होत आहे. तासनतास शेतकरी, व्यापारी व ग्राहकांना वाहतुक कोंडीत अडकत आहे.
या शेतकरी व व्यापार्‍यांच्या प्रश्‍नाकडे बाजार समितीकडून दुर्लक्ष होत असून, या नियोजनशून्य कारभाराचा फटका शेतकरी, ग्राहक व व्यापार्‍यांना बसत आहे. कांद्यासाठी उपबाजार समितीमध्ये आनखी दोन ते तीन सेल हॉल उभारण्याची मागणी व्यापार्‍यांमधून होत आहे. तर पार्किंगची योग्य सोय नसल्याने वाहतुक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, शेतकरी, व्यापारी व ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे