पोलीस कर्मचार्यांच्या आई-वडिलांना जबर मारहाण
शहराजवळील नागरदेवळे परिसर येथील व्हिडिओकॉन कंपनी मागे शेलार मळ्यात राहणारे सुमन देविदास शेलार यांना मारहाण प्रकरणी भिंगार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी धोंडीराम शेलार याने सुमन शेलार यांना शिवीगाळ केली होती. या विरोधात सुमन शेलार यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला धोंडीराम शेलार यांच्या विरोधात दि. 10 डिसेंबर रोजी एन.सी. दाखल केली होती. जर या एन.सी. वरुन पोलिसांनी योग्य वेळी संबंधित व्यक्तीला योग्य ती समज दिली असती तर हा प्रकार घडला नसता. पोलिसांनी योग्य ती काळजी न घेतल्याने हा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे.
वडिलांच्या विरोधात एन.सी. दाखल केल्याच्या मनात राग धरून दि.5 जानेवारीला सुमन शेलार व देविदास शेलार यांना आरोपी निखिल धोंडीराम शेलार यांनी घरात घुसून जबर मारहाण केली. सदर गुन्हा दाखल केल्यानंतर हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असतानादेखील आरोपी निखील शेलार याला पकडण्यासाठी पोलिस यंत्रणेला चार दिवस लागले. तर 8 जानेवारी रोजी सकाळी ठरलेल्या प्रोसेसप्रमाणे अटक दाखवून न्यायालयाकडून आरोपी जामिनावर 8 जानेवारी रोजी दुपारी घरी आल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपीस काही ठराविक पोलीस मदत करत असल्याचे समजते आहे. सदर आरोपीचे चायनीज हॉटेल व्यवसाय आहे. या ठिकाणी अवैध दारू पिण्यास मुभा दिली जाते. या अवैध धंद्याच्या माध्यमातून ठराविक पोलीस बीट अमलदाराच्यात आर्थिक उलाढालीचे चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांचे व आरोपीचे घट्ट संबंध आहेत. आरोपीस जामीनसाठी मदत कशी होईल? याची खबरदारी घेतली जात तर नाही ना, असा संशय व्यक्त होत आहे. सुमन देविदास शेलार यांचा मुलगा पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. आई, वडील देविदास शेलार यांना किरकोळ कारणावरून जबर मारहाण शिवीगाळ करण्यात आली. हे प्रकरण पाहता सदर गुन्हा पोलिसांच्या धिम्म प्रक्रियेमुळे घडला आहे. अशी तक्रार सुमन देविदास शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आरोपी निखिल धोंडीराम शेलार याच्यावर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला दंड संहिता कलम 452, 427, 336, 324, 223, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कर्मचार्यांच्या आई-वडिलांसोबत अशा घटना घडत असतील आणि पोलीस या पद्धतीने कारवाई करत असतील तर सर्वसामान्य नागरिक पोलीस न्याय कसा देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.