बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी वन मजूराचा मृत्यू.

श्रीरामपूर येथे चार दिवसांपूर्वी एका बिबट्याने भर वस्तीमध्ये धुमाकूळ घातला होता. बिबट्याला जेरबंद करताना राहुरी येथील वन मजूर लक्ष्मण गणपत किनकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचे आज पहाटेच्या दरम्यान निधन झाले आहे.
पाच डिसेंबर रोजी श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती व त्या परीसरातील भर लोकवस्तीमध्ये एका बिबट्याने धुमाकून घातला होता. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते. बिबट्याला पकडण्यासाठी जिल्ह्यातील वन विभागाचे तसेच स्थानिक प्रशासनाच्या वतीने अथक मेहनत घेण्यात आली. तीन तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले. दरम्यान बिबट्याने राहुरी येथील वन विभागातील वन मजूर लक्ष्मण किनकर यांच्या मांडीला बिबट्याने चावा घेतला होता. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना अहमदनगर येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान आज पहाटे दिड वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे.
लक्ष्मण गणपत किनकर वय ५० वर्षे हे राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील रहिवासी असून त्यांच्या निधनाने राहुरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पाश्चत पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे.
लक्ष्मण गणपत किनकर हे राहुरी येथील वन विभागात मजूर या पदावर कार्यरत होते. मग त्यांना बिबट्याला पकडण्यासाठी कसे काय पाठविण्यात आले. त्यांना बिबट्या सारखे हिंस्त्र प्राणी पकडण्याचे प्रशिक्षण होते का? असा सवाल जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांनी केला आहे. या घटनेची वरीष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करण्यात यावी. या प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच लक्ष्मण किनकर यांना शासनाने जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी धनराज गाडे यांनी केली आहे.