भरलेली विहीर, तरीही पाण्याची

भातकुडगाव : वडुले खुर्द येथे हर घर जल पाणी योजनेअंतर्गत नवीनच टाकी, नवीन विहीर व पाइपलाइन सुरु होऊनही गावाला पाणीपुरवठा केला जात नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले असूनही केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे योजना धूळ खात पडली आहे. गावशिवारात जुन्या दोन विहिरी व एक पाण्याची टाकी आहे. नवीन योजनेत एक विहीर एक टाकी गावाला उपलब्ध झाली आहे.अशा सर्व सुविधा उपलब्ध असूनही गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील पाझर तलावातील विहिरीत मोटार आहे मात्र पाइपलाइन नादुरुस्त असल्याने पाणीपुरवठा होत नाही. याकडे गेल्या अनेक दिवसापासून दुर्लक्ष केले जात आहे. चालू वर्षी नवीन विहिरीचे व पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. त्यामधून गावला अजून पाणीपुरवठा झाला नाही. गावाच्या पाण्याची टंचाई कधी भागणार, याकडे कोण लक्ष देणार का, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. सध्या ग्रामपंचाइमध्ये प्रशासकराज चालू आहे. मात्र कोण प्रशासक आहे हेच अजूनतरी गावाला माहिती नाही. ग्रामसेवक हे भ्रष्टाचारामुळे चौकशीच्या सापळ्यात अडकल्यामुळे ग्रामपंचायतीकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. मात्र आता गावाने पाणी कुणाकडे मागायचे अशी परिस्थिती वडुलेखुर्द ग्रामस्थांची झाली आहे.