मंजूर पेन्शन मिळण्यासाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे उपोषण
संस्थेकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नसल्याने पेन्शन पासून वंचित कुटुंबीयावर उपासमारीची वेळ
पेन्शन मंजूर होऊनही ती मिळत नसल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली असता सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर पवार यांनी जिल्हा परिषद येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालया समोर आमरण उपोषण केले सुरु केले आहे. या उपोषणात अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, सेवानिवृत्त माध्यमिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष रमेश जाधव, सचिव रोहिदास कांबळे, उपाध्यक्ष एकनाथ जगताप, प्रभाकर खणकर, माजी मुख्याध्यापक दत्तात्रय राऊत, एकनाथ जगताप, बी.वाय. पांडुळे, एस.के. सुद्रिक, गणपत उंडे, प्रा. शिवाजी गवळी, श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विश्वनाथ शेलार आदी सहभागी झाले होते.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर पवार हे एका नामांकित शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर सध्याचे मुख्याध्यापक ए.बी.सी. फॉर्मवर (ना हरकत प्रमाणपत्र) सही करत नसल्याने मागील काही वर्षापासून त्यांना पेन्शन पासून वंचित रहावे लागत आहे. सदर प्रश्नी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र मुख्याध्यापकांना एक समजपत्र देऊन पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही. पेन्शन मिळण्याच्या दृष्टीकोनाने ए.बी.सी. फॉर्मवर सही होऊन ते ट्रेझरीत जाणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पेन्शन प्रस्ताव शासनाकडे तब्बल एक वर्ष उशीरा गेला आहे. तर पेन्शन मंजूर होऊन दोन महिने उलटले आहे. मात्र मुख्यध्यापकाची सही होऊन संस्थेकडून ए.बी.सी. फॉर्म (ना हरकत प्रमाणपत्र) मिळत नसल्याने पेन्शन मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने उपासमारीची वेळ आली असून, त्वरीत मंजूर झालेली पेन्शन मिळण्याची मागणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर पवार यांनी केली आहे. या उपोषणास अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, अहमदनगर जिल्हा माध्यमिक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, माजी मुख्याध्यापक संघ, सेवानिवृत्त माध्यमिक कल्याणकारी संघ, अहमदनगर जिल्हा क्रीडा महासंघ या संघटनांच्या वतीने पाठिंबा देऊन सदर प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला आहे.