महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना आरोग्यसेवेची गरज -नेत्रदूत जालिंदर बोरुडे

महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना आरोग्यसेवेची गरज भासत आहे. खर्चिक आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली असून, विविध शिबीराच्या माध्यमातून गरजूंना आधार मिळत आहे. सामाजिक जबाबदारी व जाणीवेतून रुग्णसेवा काळाची गरज बनली आहे. त्रिमुखे हॉस्पिटलच्या माध्यमातून सामाजिक भावनेने रुग्णसेवा सुरु असून, कोरोना काळातही त्रिमुखे दांम्पत्यांनी कोरोना रुग्णांसाठी मोठे योगदान दिल्याची भावना फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी व्यक्त केली.
शहरातील मार्केटयार्ड येथील त्रिमुखे हार्ट अ‍ॅण्ड चेस्ट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ह्रद्य रोग व छातीच्या आजार तपासणी व मार्गदर्शन शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी बोरुडे बोलत होते. सुभाष त्रिमुखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र कांबळे, डॉ. विद्याधर त्रिंबके, ह्रद्यरोग तज्ञ डॉ. राहुल त्रिमुखे, छाती व फुप्फुसरोग तज्ञ डॉ. प्रणाली त्रिमुखे, वैभव पोखरणा, सदाशिव ससाणे, गोरख वाघुंबरे, हनुमान ठाकूर, रमेश पत्रे, सुर्यकांत हळगावकर, प्रदीप उमाप, सुशिला त्रिमुखे, जयश्री त्रिमुखे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात ह्रद्यरोग तज्ञ डॉ. राहुल त्रिमुखे यांनी धकाधकीच्या जीवनात नागरिकांनी आरोग्याबाबत जागृक राहण्याची गरज आहे. नियमित तपासणी केल्यास योग्यवेळी उपचार होऊ शकतो. तसेच रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ह्रद्य व छातीच्या आजारासंबंधी अनेक अवघड केस घेऊन रुग्ण येथे येत असतात. लहान मुलांपासून तर वृध्दांपर्यंन्त गंभीर आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. रविंद्र कांबळे म्हणाले की, त्रिमुखे दांम्पत्यांची रुग्णसेवा कौतुकास्पद आहे. दोन्ही आपल्या क्षेत्रात मास्टर असलेले डॉक्टर एखाद्या मोठ्या शहरात हॉस्पिटल उभे केले असते. मात्र सामाजिक भावनेने त्यांनी आपल्या शहरात येऊन देऊ केलेली सेवा प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबीरास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये 157 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच शिबीरार्थी रुग्णांना अल्पदरात पुढील उपचार केले जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश त्रिमुखे यांनी केले. आभार डॉ. प्रणाली त्रिमुखे यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी  त्रिमुखे हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी व सहकारींनी परिश्रम घेतले.