राक्षसवाडी फाट्यावर दारुचा साठा जप्त
नगर : कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राक्षसवाडी फाट्याजवळ हॉटेल शिवार येथे नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून दारुचा साठा जप्त केला आहे . या प्रकरणी बाळू भानुदास काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना राक्षसवाडी खुर्द शिवारात हॉटेल शिवारच्या आडोशाला बाळू काळे हा देशी – विदेशी दारूची अवैध विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती . त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण , पोलिस नाईक शंकर चौधरी , संभाजी कोतकर , सुनील माळशिकारे यांच्या पथकाने सापळा लावला . पोलिसांची चाहूल लागताच काळे हा हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या वन विभागाच्या जंगलात अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला . पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये ऑफिसर चॉईस नावाच्या दारूच्या बाटल्यांचा मुद्देमाल जप्त केला आहे . सुनील चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास कर्जत पोलिस करत आहेत .