रावसाहेब पटवर्धन पतसंस्था मध्ये 65 कोटीचा गैरव्यवहार

रावसाहेब पटवर्धन पतसंस्था व विलिनीकरणानंतर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या चौघांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी नामंजूर केले. यामध्ये पतसंस्थेच्या अध्यक्ष लतिका नंदकुमार पवार, उपाध्यक्ष सुभाष विद्याधर रेखी व संचालक लक्ष्मण सखाराम जाधव, प्रकाश नथ्थू सोनवणे यांचा समावेश आहे. मंगळवारी जामीन अर्जावर सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला होता. अर्जदार पक्षाचा युक्तीवाद झाला. यानंतर न्यायालयाने चौघांचे जामीन अर्ज नामंजूर केले आहेत.

ठेवीदारांच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. या चौघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर जिल्हा न्यायाधीश बी. एम. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. युक्तिवादात अ‍ॅड. पवार यांनी सांगितले, संचालकांनी ठेवीदारांच्या कोट्यवधी रूपयांचा अपहार केला असून, हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. या अपहाराचे फॉरेन्सिक ऑडिट झाले आहे. यात संस्थेच्या संचालकांनी ६५ कोटी ३१ लाख ८० हजार २५३ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २४८ संचालकांचे जबाब नोंदविले आहेत. पतसंस्थेच्या कर्ज वितरणात मोठी अनियमितता आहे, असे सांगितले होते. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्यधरून न्यायालयाने चौघांचे जामीन अर्ज नामंजूर केले आहेत.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी चौघांना अटक केल्यानंतर इतर संचालक पसार झाले आहेत. २० दिवसानंतरही त्यांचा पोलिसांना शोध लागला नाही. मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांचे पैसे परत न दिल्यामुळे रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्यासह ३० जणांविरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात ७ ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ठेवीदार इस्माईल गुलाब शेख (रा. तारकपूर) यांनी फिर्याद दिली होती. चौघांना अटक झाल्यानंतर इतर आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान त्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.