लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समाविष्ट करावे जन आधार सामाजिक संघटनेची मागणी.

शोषित, दलित, पीडित वर्गाच्या वेदना शब्दबद्ध करीत शौर्याची दौलत देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यांचे नाव “महापुरुषांच्या” यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव नाकारल्याचा जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारचा निषेध नोंदवून तत्काळ भारत सरकार अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या महापुरुषांच्या यादीत लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे नाव समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली.तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयघोष करीत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शहराध्यक्ष शहानवाज शेख, बाळासाहेब केदारे, संतोष उदमले, संदीप तेलधुने, विजय मिसाळ, अमित गांधी, दिपक गुगळे, आकाश लोखंडे, हर्षद शिर्के, राजू शिर्के, गणेश आडागळे, रोहित शिंदे, सुनील सकट आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.                                                                भारत सरकार अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन या संस्थे मार्फत राज्यातील महापुरुष, प्रबोधनकार व समाज सुधारक, व्यक्तींची नावे या यादीत समाविष्ट आहेत.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव या यादीत घेणे गरजेचे असताना फाऊंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा प्रस्ताव नाकारला आहे, ते प्रतिष्ठित नव्हते असे नमूद करुन त्रिवेदी यांनी अकलेचे तारे तोडण्याचे काम केले, असल्याचे निवेदनात नमूद करून या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दीड दिवस शाळा शिकून 13 लोकनाट्य, 14 कथा, 6 नाटके, 37 कादंबऱ्या, 15 पोवाडे, 8 गीतलेखन, 7 चित्रपटकथा अशा असंख्य साहित्य संपत्तीची निर्मिती केली या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी अपेक्षित घटकाच्या व्यथा मांडल्या जगाच्या सत्तावीस भाषेत त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सात समुद्रापार पोहोचवला असे असताना देखील सत्यशोधक बहुजन समाजाचे जननायक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत समावेश करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.