वडीलांचा उपचारासाठी धावणार्‍या भंडारी भगिनींची राष्ट्रीय स्पर्धेत मजल

राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी भाग्यश्री, साक्षी व करणची निवड

ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशनचे खेळाडू साक्षी भंडारी, भाग्यश्री भंडारी व करण गहाणडुळे यांची नागालँड येथे होणार्‍या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अळकुटी (ता. पारनेर) या एका छोट्या गावातून आलेल्या तिन्ही खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या राज्य क्रॉस कंन्ट्री स्पर्धा सांगली येथे पार पडली होती. या स्पर्धेतील विजेत्यांच्या परफॉर्मन्सनुसार राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच राज्य संघटनेने 16 वर्ष वयोगटात साक्षी भंडारी, तर 20 वर्ष वयोगटात भाग्यश्री भंडारी व करण गहाणडुळे यांची निवड झाल्याचे अधिकृतरित्या प्रसिद्ध केले आहे.राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स क्रॉस कंट्री स्पर्धा नागालँड येथे 26 मार्च पासून होणार आहे. या स्पर्धेत ट्रॅक रेसर्स स्पोर्टस् फाऊंडेशनचे हे खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या खेळाडूंना श्रीरामसेतू आवारी, समीर शेख व महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स असोशिएशनचे सहसचिव दिनेश भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

वडीलांचा उपचार करता यावा म्हणून व्यावसायिक स्पर्धेत धावून पैसा उभ्या करणार्‍या अळकुटी येथील भंडारी भगिनींच्या कार्याची दखल नुकतीच सर्व माध्यमांनी घेतली होती. त्या साक्षी व भाग्यश्री भगिनींची पुन्हा राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी निवड झाली असून, जिद्द व मेहनत करण्याची तयारी असेल तर पुरेशा सुविधांचा अभाव असतानाही यशाचे शिखर पादाक्रांत करता येते हे पुन:श्‍च भंडारी भगिनींनी दाखवून दिले आहे.

या यशस्वी खेळाडूंचे अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद तनपुरे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी रंगनाथ डागवाले, शिवछत्रपती पुरस्कारार्थी सुनिल जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, महाराष्ट्र शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आप्पासाहेब शिंदे, संचालक महेंद्र हिंगे, संदीप घावटे, सचिन काळे, अमित चव्हाण, गुलजार शेख यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.