वासन टोयोटाचे शहरात सामाजिक बांधिलकी जपून कार्य सुरु -आमदार संग्राम जगताप

वासन टोयोटाच्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद 368 रुग्णांची मोफत तपासणी तर 113 रुग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

वासन टोयोटाचे शहरात सामाजिक बांधिलकी जपून कार्य सुरु आहे. व्यवसायाबरोबर समाजातील गरजूंना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला. वासन ग्रुप संपुर्ण महाराष्ट्रात सामाजिक भावनेने कार्य करीत असून, राज्यातील अनेक युवकांना रोजगार देण्याचे काम त्यांनी केले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
दृष्टीदोष असलेल्या गरजूंसाठी वासन उद्योग समूहाचे चेअरमन विजयजी वासन यांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टोयोटा, किर्लोस्कर मोटर्सचे फिल्ड ऑफिसर नोएल सलधाना, टोयोटाचे फिल्ड सेल्स मॅनेजर सुजीत नायर, शोरुमचे जनक आहुजा, तेजींद्र बेदी, हरिश शर्मा, अनिश आहुजा, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, करण धुप्पड, मनोज मदान, फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, राजीव बिंद्रा, इंद्रजीत नय्यर, अभिमन्यू नय्यर, डॉ. सुरेंद्र खन्ना, जय रंगलानी, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, जतीन आहुजा, कैलाश नवलानी, दिपक जोशी, अविनाश आडोळकर आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, दरवर्षी वासन टोयोटाच्या वतीने या शिबीराचे आयोजन केले जाते. सण, उत्सव काळात देखील सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. तर कोरोना काळात घर घर लंगरसेवेच्या माध्यमातून सेवा देण्यात आली. तसेच फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी देखील लाखो गरजू घटकांना मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करुन दिल्याचे त्यांनी कौतुक केले.

.
प्रास्ताविकात जनक आहुजा यांनी वासन ग्रुपची स्थापना स्वर्गीय कुंदनलालजी वासन यांनी 1961 मध्ये नाशिक येथे केली. त्यांनी लावलेले छोट्याच्या रोपांचे आज विजय वासन आणि तरुण वासन यांनी मोठ्या वटवृक्षात रुपांतर केले. या उद्योग समुहाच्या वतीने सामाजिक सेवाभाव जपून व्यवसाय सुरु आहे. शोरूमच्या माध्यमातून रक्तदान व आरोग्य शिबीरसह गरजू घटकांना नेहमीच मदत देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. हरजितसिंह वधवा यांनी व्यापाराबरोबर सामाजिक देणे लागते, या भावनेने वासन टोयोटाचे कार्य सुरू आहे. जालिंदर बोरुडे यांनी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या माध्यमातून वंचितांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचे काम केले. संग्राम जगताप यांनी देखील कोरोना काळात नगरकरांना आधार दिले. तर शहराच्या विकासाचे व्हिजन घेऊन कार्य सुरु असल्याचे सांगितले. सुजित नायर यांनी वासन परिवार राज्यासह नगरमध्ये उत्साहाने सामाजिक कार्यात योगदान देत असल्याचे स्पष्ट केले.
या शिबीरासाठी शहर व उपनगरात दहा ठिकाणी नोंदणी सेंटर ठेवण्यात आल्याने नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये संध्याकाळ पर्यंत तब्बल 368 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तर 113 रुग्णांवर पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहेत. रुग्णांची तपासणी डॉ. संजय शिंदे, सिस्टर माया आल्हाट, मनिषा कोरडे, अमित पिल्ले यांनी केली. कार्यक्रमाच्या ठिकाणी शिबीरार्थींसाठी जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल पोळ यांनी केले. आभार प्राची जामगावकर यांनी मानले.