वीरपिता दत्तात्रय तरटे व ह.भ.प. महादेव गाडीलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताचा सामाजिक उपक्रम

महागाई व धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी मोफत आरोग्य शिबीरे आधार ठरत आहे. समाजाची गरज ओळखून सामाजिक योगदान देण्याची गरज आहे. धार्मिक विधी-परंपरांना सामाजिक कार्याची जोड दिल्यास समाजाची प्रगती साधली जाणार असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले.
वीरपिता दत्तात्रय तरटे, ह.भ.प. महादेव गाडीलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पळवे खुर्द (ता. पारनेर) येथे फिनिक्स सोशल फाऊंडेशन, तरटे व गाडीलकर परिवाराच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निचित बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी संदीप चव्हाण, जितेंद्र पाटील, नाशिकचे उपायुक्त गोरक्ष गाडिलकर, उद्योजक कैलास गाडिलकर, फक्कड तरटे, तहसिलदार नरेश बहिरम, साहेबराव सोनवणे, नायब तहसिलदार सुभाष कदम, फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, संजय शिंदे, सिस्टर माया अल्हाट, सचिन सोनवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाऊंडेशन दृष्टीदोष असलेल्या वंचित घटकातील रुग्णांची मागील 26 वर्षापासून सेवा करीत आहे. अनेक गरजू रुग्णांना आधार देण्याचे कार्य सुरु असून, कोरोनानंतर सर्वसामान्यांची गरज ओळखून हे शिबीर अविरत सुरु ठेवण्यात आले आहे. महागडी उपचार पध्दती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरची गोष्ट असून, या शिबीराच्या माध्यमातून दृष्टीदोष असलेल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी देण्यासाठी तरटे व गाडीलकर परिवाराने घेतलेला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबीरात 217 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. 23 गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी गरजूंना अल्प दरात मोफत नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले. या शिबीरासाठी पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलचे विशेष सहकार्य लाभले.