शहरातील गाझीनगर व संजयनगरला दूषित पाण्याने नागरिक आजारी

अन्यथा महापालिके समोर नागरिकांसह उपोषण करण्याचा इशारा

शहरातील काटवन खंडोबा भागातील गाझीनगर व संजयनगर मध्ये दूषित पाण्याने नागरिक आजारी पडत असून, नियमित व शुध्द पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने महापालिका उपायुक्त डॉ. श्रीनिवास कुरे यांना देण्यात आले. यावेळी रिपाईचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख, शहेबाज शेख, इशान शेख आदी उपस्थित होते.
काटवन खंडोबा भागातील गाझीनगर व संजयनगर भागात अनेक दिवसांपासून नळाद्वारे मैलमिश्रीत दूषित पाणी येत आहे. यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरातील नागरिक व लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून, त्यांना उलट्या व जुलाबचा त्रास सुरु झाला आहे. घरोघरी आजारी रुग्ण आढळू लागले आहेत. शुध्द पाणी मिळण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून, त्वरीत नागरिकांना नळाद्वारे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा महापालिके समोर नागरिकांसह उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.