शिक्षक परिषदेच्या वतीने कोरोना काळात सेवा देणार्‍या डॉक्टरांचा सन्मान

कोरोना महामारीत डॉक्टरांनी देवदूताची भूमिका बजावली -प्रा. माणिक विधाते

कोरोना काळात स्वत:च्या जिवाची व कुटुंबीयांची पर्वा न करता चोवीस तास कोरोना रुग्णांसाठी सेवा देणार्‍या शहरातील डॉ. सुदाम जरे, डॉ. राहुल मते, डॉ. राजेंद्र गायके, डॉ. अक्षयदीप झावरे, डॉ. पांडूळे, डॉ. शिंदे यांचा शिक्षक परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. यावेळी शिक्षक परिषदेचे नेते तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, प्रा. भानुदास बेरड, प्रा.अनिल आचारी, प्राचार्य सुनिल पंडित, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, शैलेश सदावर्ते, विशाल म्हस्के, गणेश बोरुडे, सखाराम गारुडकर, विठ्ठल ढगे आदी उपस्थित होते.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असता, डॉक्टरांनी जिवाची बाजी लाऊन त्यांना चांगले केले. रुग्णांजवळ कुटुंबातील व्यक्ती येण्यास घाबरत असताना डॉक्टरांनी त्यांना आधार देण्याचे काम केले. डॉक्टरांच्या सेवेमुळे हजारो कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. कोरोना महामारीत डॉक्टरांनी देवदूताची भूमिका बजावली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
बाबासाहेब बोडखे यांनी डॉक्टरांमुळे कोरोना महामारीत अनेकांचे जीव वाचले. शहरात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने हॉस्पिटल गच्च भरले असताना देखील डॉक्टरांनी चोवीस-चोवीस तास सेवा दिली. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे रुग्णांची काळजी घेण्यात आली. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.