शिवाजी नगरला महिला आणि ज्येष्ठांची मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप
पै. महेश लोंढे यांचा सामाजिक उपक्रम जनसेवेच्या भावनेने महेश लोंढे यांचे कार्य -सिध्दीनाथ मेटे महाराज
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड, शिवाजी नगर येथे दृष्टीदोष असलेल्या नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवा सेनेचे शहराध्यक्ष पै. महेश लोंढे यांच्या पुढाकाराने झालेल्या या शिबिरात 375 नागरिकांची तपासणी करण्यात आली. तर 45 गरजूंवर मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
शिबिरार्थी गरजूंचे डोळे तपासून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज, युवा सेनेचे शहराध्यक्ष पै. महेश लोंढे, राजेंद्र शिंगवी, मधुकर टोणे, गणेश खंडागळे, दिपक कारखिळे, महेश दिवेकर आदी उपस्थित होते.
ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज म्हणाले की, वंचितांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी व नगर-कल्याण रोड येथील प्रश्न सोडविण्याचे कार्य महेश लोंढे करीत आहे. या भागातील खड्डेमय रस्त्याचा असा की, पाण्याचा प्रश्न त्यांनी प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. जनसेवा या भावनेने लोंढे यांचे कार्य सुरु असून, त्यांच्या सामाजिक कार्याने मोठा सर्वसामान्य वर्ग त्यांच्याशी जोडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
युवा सेनेचे शहराध्यक्ष पै. महेश लोंढे म्हणाले की, सर्वसामान्यांची सेवा या भावनेने कार्य सुरु आहे. गरजू घटकातील दृष्टीदोष असलेल्यांना नवदृष्टी मिळण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवकांना संघटित करुन युवा सेनेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात येत आहे. सामाजिक भान ठेवून व गोरगरिबांची गरज ओळखून शिबिराचा उपक्रम घेण्यात आला होता. शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर-कल्याण रोड परिसरातील नागरी प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. डोळ्यांची तपासणी व खर्चिक शस्त्रक्रियेसाठी या शिबिराचा लाभ झाल्याबद्दल उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी आभार मानले.